ट्विटरचे सर्वात मोठे भागभांडवलधारक झालेले एलन मस्क हे आता काय पुढे पाऊल उचलणार याची चर्चा गेले आठवडाभर सुरु होती. गेल्या आठवडाभरात काही सुचक ट्विट करत मोठे पाऊल उचलण्याचा एक प्रकारे इशाराच एलन मस्क यांनी दिला होता. मात्र गेल्या ४८ तासात नाट्यमय घडामो़डी घडल्या असाव्यात, कारण ट्वीटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी सोमवारी सकाळी ट्विट करत गेले काही दिवस सुरु असलेली गरमागरम चर्चा थंडावण्याचे जणू संकेत दिले.
पराग अग्रवाल यांनी एक ट्विट करत सोबत छोटेखानी प्रसिद्ध पत्रक शेयर करत एलन मस्क यांच्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. एलन मस्क हे ट्वीटरच्या बोर्डामध्ये – संचालक मंडळात सहभागी होणार नसल्याचं पराग अग्रवाल यांनी स्पष्ट केल आहे.
‘एलन मस्क यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा केली. संचालक मंडळात सहभागी झाल्यानंतर असलेली आव्हाने याबाबतची स्पष्टता एलन मस्क यांच्यापुढे ठेवली. कंपनीचे सर्वात मोठे भागभांडवलधारक जर संचालक मंडळात सहभागी होत असतील तर त्याचा कंपनीला आणि इतर भागभांडवलधारक यांना फायदाच होईल असं सांगत एलन मस्क यांना मंडळात जागा देऊ केली, ९ एप्रिलपासून हे लागू होणं अपेक्षित होतं. पण त्याच दिवशी सकाळी एलन मस्क यांनी संचालक मंडळात सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलं. भागभांडवलधारकांच्या सुचनांचे आम्ही नेहमीच स्वागत करत आलो आहे. एलन मस्क हे कंपनीतील सर्वात मोठे भागभांडवलधारक आहेत आणि आम्ही त्यांच्या सुचना खुल्या मनाने स्वीकारू. कंपनीपुढे अनेक आव्हाने आहेत मात्र आम्ही आमच्या ध्येयापासून जराही दूर जाणार नाही. निर्णय कोणते घ्यायचे आणि कसे अंमलात आणायचे हे संपुर्णपणे आमच्या हातात आहे. तेव्हा कामाकडे लक्ष केंद्रीत करुया’, असं या छोटेखानी प्रसिद्धी पत्रक पराग अग्रवाल यांनी म्हटलं आहे.
“ट्विटरचं हेडक्वार्टर रिकामंच आहे तर मग तिथे…”, पोलनंतर एलन मस्कचं अजून एक ट्वीट व्हायरल!
एलन मस्क यांनी ९.२ टक्के भागभांडवल खरेदी करण्यासाठी ३ बिलियन अमेरिकन डॉलर्स खर्च केलं. तेव्हापासून ते ट्विटरमध्ये काय बदल करणार किंवा बदल करायला भाग पाडणार का ? संचालक मंडळात सहभागी होणारा का ? अशी विविध चर्चा सुरु होती. ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांच्या सविस्तर अशा स्पष्टीकरणानंतर सध्या तरी या सर्व चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे असं म्हणायला हरकत नाही.