एलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा दक्षिण कोरियाच्या घटत्या लोकसंख्येबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टला उत्तर देताना मस्क यांनी ही धोक्याची घंटा वाजवली. या पोस्टमध्ये दक्षिण कोरियातील लोकसंख्या घटण्यावर चर्चा करणाऱ्या एका लेखाचा स्क्रीनशॉट समाविष्ट होता.

टेस्ला व स्पेसएक्सचे सीईओ एलॉन मस्क यांनी गेल्या महिन्यातही अशाच प्रकारची चेतावणी दिली होती. यात दावा केला होता की या समस्येमुळे अनेक देश गायब होऊ शकतात. तसंच, जगभरातील लोकसंख्या घट भरून काढण्यासाठी केवळ स्थलांतर पुरेसे नसल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.

एलॉन मस्क यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये दक्षिण कोरियातील प्रजनन दरामुळे तिथे घटत जाणाऱ्या लोकसंख्येचं गणित मांडलं आहे. त्यात म्हटलंय की, दक्षिण कोरियामध्ये एकूण प्रजनन दर ०.६८ टक्के आहे. प्रत्येक २०० प्रजनन वयाचे प्रौढ ६९ मुलांना जन्म देतील, त्या ६९ मुलांकडून २३ नातवंडे निर्माण होतील. त्यांच्याकडून आठ पतवंडे होतील. तीन पिढ्यांच्या कालावधीत ९६ टक्के लोकसंख्या घट होण्याची शक्यता आहे.

हा स्क्रीनशॉट शेअर करताना एलॉन मस्क म्हणाले की ही आपत्तीजनक लोकसंख्या घट आहे.

जपानबाबत काय म्हणाले होते एलॉन मस्क?

गेल्या महिन्यात जपानच्या लोकसँख्या घटण्यावरील एका अहवालाला उत्तर देताना मस्क यांनी कबूल केलं होतं की स्थलांतरामुळे काही देशांमध्ये कामगारांची कमतरता तात्पुरती कमी होऊ शकते, परंतु जागतिक लोकसंख्या संकटावरहा दीर्घकालीन उपाय नाही.

जपानच्या वेगाने कमी होणाऱ्या लोकसंख्येमुळे अस्तित्वाच्या धोक्याला तोंड द्यावे लागत असल्याचा इशारा देणाऱ्या अहवालाला उत्तर देताना लोकसंख्या शास्त्रज्ञ हिरोशी योशिदा यांनी भाकित केलं आहे की, २७२० पर्यंत १४ वर्षांखालील फक्त एक मूल देशात राहू शकेल.

यापूर्वी जानेवारीमध्ये मस्क यांनी इशारा दिला होता की आशियातील घटत्या जन्मदरामुळे लोकसंख्या घटू शकते. सिंगापूरला विशेषतः असुरक्षित म्हणून वेगळे केले होते. हा ट्रेंड असाच सुरू राहिला तर अनेक देश नामशेष होतील, अशी भीती व्यक्त केली होती.

Story img Loader