Elon Musk Mocks Joe Biden in US Presidential Election: राजकीय टीकेची भाषा खालावत चालली असल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात वारंवार ऐकायला मिळत आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे), शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि थेट भारतीय जनता पक्षापर्यंत अनेक नेते एकमेकांवर खालच्या पातळीवर टीका करताना दिसत आहेत. एकीकडे महाराष्ट्रातल्या या राजकीय भाषेची चर्चा होत असताना दुसरीकडे थेट जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेतल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही काहीसं असंच चित्र निर्माण झाल्याचं चित्र दिसू लागलं आहे. जो बायडेन आणि एलॉन मस्क यांच्यात नुकताच रंगलेला कलगीतुरा याचंच एक उदाहरण म्हणता येईल!
अमेरिकेतली अध्यक्षपदाची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस व रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये शेवटच्या टप्प्यात काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक भाषणांच्या जोरावर मैदान मारून नेण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे कमला हॅरिस अमेरिकन जनतेबरोबरच अमेरिकेतील इतर देशांमधील नागरिक व स्थानिक गटांना साद घालत विजयासाठी प्रयत्न करत आहेत.
जो बायडेन विरुद्ध एलॉन मस्क कलगीतुरा!
टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा दर्शवल्यानंतर ट्रम्प यांचं पारडं जड झाल्याचं चित्र निर्माण झालं. त्यामुळे आता बायडेन यांच्याकडून ट्रम्प यांच्याबरोबरच एलॉन मस्क यांनाही लक्ष्य केलं जाऊ लागलं आहे. या दोघांमधल्या अशाच एका आरोप-प्रत्यारोपांची सध्या सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली आहे.
जो बायडेन यांची शनिवारी पेनसिल्वानियामध्ये प्रचारसभा झाली. यावेळी त्यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांवर तोंडसुख घेतलं. “ट्रम्प आणि त्यांच्या समर्थक मित्रांना श्रीमंतांचे कर मोठ्या प्रमाणावर कमी करायचे आहेत. मी तुम्हाला सांगतो, मी जेव्हा स्क्रँटनमध्ये होतो, तेव्हा आम्हाला संध्याकाळी रस्त्यावरून फिरायला अडचणी यायच्या. हीदेखील (ट्रम्प व त्यांचे समर्थक) अशीच माणसं आहेत, ज्यांच्या पार्श्वभागावर तुम्हाला चापट मारावीशी वाटेल”, असं जो बायडेन म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प यांचं बायडेन यांना प्रत्युत्तर!
दरम्यान, जो बायडेन यांच्या या टीकेला डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या शैलीत प्रत्युत्तर दिलं. “मला तर माहितीही नाही, जो बायडेन अजूनही प्रचारात आहेत का?” असा खोचक सवाल ट्रम्प यांनी नॉर्थ कॅरोलिनामधील एका प्रचारसभेत विचारला.
एलॉन मस्क यांची मिश्किल पोस्ट व्हायरल
बायडेन यांना ट्रम्प यांनी दिलेल्या उत्तरापेक्षाही एलॉन मस्क यांची खोचक टिप्पणी जास्त व्हायरल होऊ लागली आहे. एलॉन मस्क यांनी बायडेन यांच्या त्या विधानाचा व्हिडीओ रीट्वीट केला. त्यावरच्या पोस्टमध्ये ते म्हणाले, “या व्यक्तीने मला गे म्हटलं. आता या व्यक्तीला माझ्या पार्श्वभागावर चापट मारायचीये”! मस्क यांच्याप्रमाणेच नेटिझन्सकडून एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवरून खोचक शब्दांत टीका केली जात आहे.