Maye Musk in Mumbai for Book Launch: अवघ्या जगाला ‘टॅरिफ वॉर’मध्ये ढकलणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे असणारे टेस्लाचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांच्या आई माये मस्क सध्या मुंबईत आहेत. गेल्या आठवड्याभरापासून ७७ वर्षीय माये मस्क मुंबईतच मुक्कामी असून त्यांचा यंदाचा वाढदिवसदेखील त्यांनी मुंबईतच साजरा केला! एलॉन मस्क यांनी आईसाठी पठवलेल्या फुलांसोबत माये मस्क यांनी फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केला होता. आता माये मस्क या सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गेल्याचे फोटो व्हायरल झाले असून त्यांच्यासमवेत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसदेखील दिसत आहे.

पुस्तक प्रकाशनासाठी मुंबईत

माये मस्क यांनी ‘ए वुमन मेक्स अ प्लान’ हे पुस्तक लिहिलं असून त्या पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यासाठी माये मस्क मुंबईत दाखल झाल्या होत्या. आज त्यांच्याहस्ते त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यानंतर त्यांनी ‘राजकमल बुक्स’ला टॅग करून पुस्तकांसोबत एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांनी पुस्तकाची हिंदी आवृत्ती भाषांतरीत करून प्रकाशित केल्याबद्दल राजकमल बुक्सचे आभार मानले आहेत.

रविवारी २० एप्रिल रोजी माये मस्क यांच्या वाढदिवसानिमित्त एलॉन मस्क यांनी फुलं पाठवली होती. या फुलांसोबत माये मस्क यांनी फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केला होता. “माझ्या वाढदिवसानिमित्त मुंबईत मला ही फुलं पाठवल्याबद्दल एलॉन तुझे आभार”, असं या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं होतं.

जॅकलिन म्हणते, “माय डिअर फ्रेंड माये”

दरम्यान, जॅकलिननं सिद्धिविनायक मंदिरातील दर्शनानंतर एचटीला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये ‘माय डिअर फ्रेंड माये’ असा उल्लेख करत एलॉन मस्क यांच्या आईचं कौतुक केलं आहे. “सिद्धिविनायक मंदिरात माझी प्रिय मैत्रिण मायेसोबत दर्शन घेणं हा एक खूप सुंदर अनुभव होता. माये त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी भारतात आल्या आहेत. माये यांच्या पुस्तकातून एका महिलेचा लढा दिसून येतो. विशेषत: वय हा फक्त एक आकडा असून त्यावरून तुमच्या स्वप्नांचा किंवा ध्येयाचा अंदाज येऊ शकत नाही”, अशी प्रतिक्रिया जॅकलिननं दिली आहे.