ट्विटर कंपनीचे मालक इलॉन मस्क मागील काही दिवसांपासून अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सेन्सॉरशिपबद्दल सातत्याने आवाज उठवत आहेत. ट्विटर ही सोशल मीडिया कंपनी विकत घेतल्यानंतर त्यांनी बंदी घातलेली अनेक ट्विटर खाती पुन्हा एकदा आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आणण्याची घोषणा केली. ट्विटर खरेदी करण्याच्या आधीपासून ते समाज माध्यमांवरील सेन्सॉरशिपच्या विरोधात आवाज उठवत आहेत. पण भारतातील सोशल मीडियावरील सेन्सॉरशिपबाबत त्यांनी वेगळं मत व्यक्त केलं आहे.
‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी भारतातील सोशल मीडियावरील सेन्सॉरशिपवर भाष्य केलं आहे. “भारतात सोशल मीडियावर कठोर निर्बंध आहेत. त्यामुळे आमची वेबसाइट अमेरिका किंवा इतर पाश्चात्य देशांतील ट्विटर वापरकर्त्यांना जेवढं स्वातंत्र देते, तेवढं समान स्वातंत्र्य भारतीय ट्विटर वापरकर्त्यांना देऊ शकत नाही.”
मस्क यांनी पुढे सांगितलं की, ट्विटर कंपनी कधीकधी भारतात काही मजकूर सेन्सॉर करते. तसेच काही मजकूर ब्लॉक केला जातो. जर कंपनीने भारत सरकारचे नियम पाळले नाहीत, तर आमच्या (ट्विटर) कर्मचाऱ्यांना तुरुंगात पाठवले जाऊ शकते.
“सोशल मीडियावर कोणता मजकूर दिसायला हवा? याबाबत भारतात कठोर नियम आहेत. त्यामुळे आम्ही एका देशाच्या नियमांच्या विरोधात जाऊ शकत नाही. एकतर आमचे लोक तुरुंगात जातील किंवा आम्हाला नियम पाळावे लागतील, असे दोनच पर्याय आमच्याकडे असतील तर आम्ही नियमांचं पालन करू,” असंही मस्क यांनी म्हटलं.