ट्विटरचे मालकी हक्क मिळताच एलॉन मस्क यांनी या कंपनीतील जवळपास ५० टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकले आहे. या नोकरकपातीनंतर एक नवी माहिती समोर येत आहे. ट्विटरने घरचा रस्ता दाखवलेल्या डझनभर कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना कामावर परत येण्यास सांगितले आहे. या कर्मचाऱ्यांपैकी काहींना चुकून काढण्यात आल्याची माहिती या कंपनीशी संबंधित लोकांनी दिल्याचे वृत्त ‘ब्लुमबर्ग’ने दिले आहे.
“काही पर्यायच उरला नव्हता”, ट्विटरमधील ५० टक्के कर्मचारी कपातीवर एलॉन मस्क यांचं स्पष्टीकरण!
काही कर्मचाऱ्यांचा अनुभव आणि काम कंपनीच्या हितासाठी आवश्यक असल्याचे व्यवस्थापनाच्या लक्षात आल्यानंतर त्यांना परत कामावर रुजू होण्यास सांगण्यात आल्याचे वृत्त आहे. ट्विटरने गेल्या आठवड्यात जवळपास साडेतीन हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. या कपातीमध्ये भारतातील २३० पैकी १८० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांची कपात ट्विटरच्या सर्वच विभागांमध्ये करण्यात आली आहे.
Twitter भारतात आता ट्विटरचे १० कर्मचारीही नाहीत
अत्यंत महत्त्वाच्या तांत्रिक बाबी हाताळणाऱ्या विभागांमध्ये नोकरकपात करण्यात आलेली नाही. या कर्मचाऱ्यांना सध्या नोकरीवर कायम ठेवण्यात आलं असून त्यांच्या भविष्यातील भूमिकांविषयी लवकरच निर्णय घेण्यात येईल, असं ट्विटरकडून कर्मचाऱ्यांना कळवण्यात आलं आहे.
“सध्याच्या परिस्थितीला…”, Twitter कर्मचारी कपातीनंतर संस्थापकाची दिलगिरी
नोकरकपातीनंतर एलॉन मस्क काय म्हणाले होते?
“ट्विटरमधील कर्मचारी कपातीविषयी बोलायचं झालं, तर दुर्दैवाने आमच्यासमोर काही पर्यायच उरला नव्हता. कंपनीचं दिवसाला तब्बल ४ दशलक्ष डॉलर्सचं नुकसान होत होतं”, असं स्पष्टीकरण एलॉन मस्क यांनी या नोकरकपातीनंतर दिलं आहे. “ज्यांना कामावरून काढण्यात आलं आहे, त्यांना तीन महिन्यांचा परतावा देण्यात आला आहे. नियमात असल्यापेक्षा हा आकडा किमान ५० टक्क्यांनी अधिक आहे”, अशी माहितीही ट्वीट करत मस्क यांनी दिली आहे.