ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी या कंपनीमधून तीन हजार ७०० नोकऱ्यांची कपात करण्याची योजना आखली आहे. ही संख्या या सोशल मीडिया कंपनीच्या एकूण मनुष्यबळापेक्षा जवळपास अर्धी आहे. ‘ब्लुमबर्ग’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. कंपनीच्या खर्चात कपात करण्यासाठी मस्क यांच्याकडून हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कुठूनही काम करण्याची (Work from Anywhere) कंपनीची योजनाही बंद करण्याच्या तयारीत मस्क असल्याचे बोलले जात आहे. या कर्मचाऱ्यांना कार्यालयातून काम करण्यास सांगितलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सॅन फ्रान्सिको स्थित या कंपनीतील नोकरकपातीच्या संख्येसह इतर धोरणांमध्ये बदल केले जाण्याची शक्यता आहे. या कंपनीतून काढल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांच्या पगाराएवढा ‘सेवरन्स पे’ दिला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या वृत्तावर ट्विटरच्या प्रवक्त्याकडून अद्याप भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही.
ट्विटरचे मालकी हक्क मिळताच कंपनीच्या धोरणांमध्ये मस्क यांच्याकडून बदल केले जात आहेत. ट्विटरच्या वापरकर्त्यांना अकाऊंट वेरिफाईड करुन ‘ब्लू टिक’ मिळवण्यासाठी आता आठ डॉलर म्हणजेच अंदाजे ६६१ रुपये प्रती महिना मोजावे लागणार आहेत. ट्विटरसोबत काम करण्यास उत्सुक असलेल्या प्रकाशकांना ‘पेवॉल बायपास’ ची सुविधाही उपलब्ध केली जाणार आहे.
काय आहे वाईन अॅप? हे अॅप सुरू करण्यासाठी एलॉन मस्कने केला पोल, नेटकऱ्यांमध्येही चर्चा
मस्क यांनी ट्विटरवर ताबा घेताच सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह व्यवस्थापनातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यामध्ये कायदा विभागाचे प्रमुख विजया गड्डे, मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेगल यांचाही समावेश आहे. त्यानंतर आता जवळपास साडेतीन हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं संकट घोघावत आहे.