SpaceX Starship destroyed Video Elon Musk reaction : एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीने गुरूवारी स्टारशीप रॉकेटचे चाचणी उड्डाण केले. मात्र या चाचणी उड्डाणादरम्यान हे स्पेसक्राफ्टचा हवेतच स्फोट झाला आणि ते जमिनीवर कोसळले. कंपनीच्या टेक्सास येथील बोका चिका या प्रक्षेपण केंद्रवरून या रॉकेटचे स्थानिक वेळेनुसार ५ वाजून ३८ मिनिटांनी प्रक्षेपण करण्यात आले होते. हे कंपनीचे या वर्षातील पहिले तर एकूण सातवे चाचणी उड्डाण होते.
टेक्सासमधील स्पेसएक्स मिशन कंट्रोलचा स्टारशिपच्या सुपर हेवी फर्स्ट स्टेज बूस्टरपासून अंतराळात वेगळे झाल्यानंतर उड्डाणाच्या आठ मिनिटांनंतर त्याचा संपर्क तुटला, असे स्पेसएक्स कम्युनिकेशन्स मॅनेजर डॅन हुओट (Dan Huot) यांनी लाइव्ह दरम्यान सांगितले. दरम्यान स्टारशीपचे तुकडे होऊन ते जमिनीवर कोसळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
स्टारशीप कंपनीचे सीईओ एलॉन मस्क यांनी देखील हा व्हिडीओ शेअर केला आहे. इतकंच नाही तर मस्क यांनी मजेशरी कमेंटदेखील केली आहे. “यश अनिश्चित आहे, पण करमणूक हमखास होणार!”, असे एलॉन मस्क त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत. मात्र हा स्फोट होण्यापूर्वीत स्पेसएक्सने दुसर्यांदा मेकानिकल आर्म वापरून बूस्टरला हवेतच पकडण्याची किमया साधली. टेक्सासमधून लिफ्टऑफ झाल्यानंतर काही मिनिटातच बूस्टर पुन्हा जमिनीकडे परतले आणि त्याला ‘मेकानिकल आर्म्स’ वापरून लाँच पॅडवर पकडण्यात आले.
नेमक गडबड काय झाली?
स्पेसएक्सचे हे स्पेसक्राफ्ट पूर्वीच्या चाचणी उड्डाणांप्रमाणे गल्फ ऑफ मेक्सिकोच्या दिशेने जाणे अपेक्षित होते. याच्यामध्ये १० डमी उपग्रह ठेवण्यात आले होते आणि या उड्डाणाच्या माध्यमातून ते सोडण्याचा सराव करण्यात येणार होचा. या नवीन आणि अपग्रेड केलेल्या स्पेसक्राफ्टचे हे पहिलेच उड्डाण होते. ४०० फूट लांबीचे हे रॉकेट मेक्सिकोच्या सीमेजवळील बोका चिका येथून अवकाशात झेपावले होते. रॉयटर्सने दिलेल्या रिपोर्टनुसार अप्पर स्टेजमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने याचा स्फोट झाला. हे जगातील सर्वात मोठ्या आणि शक्तीशाली रॉकेटचे चाचणी उड्डाण होचे. नासाने या दशकाच्या अखेरीस अंतराळवीरांना चंद्रावर उतरवण्यासाठी स्टारशिप्सची एक जोडी राखून ठेवली आहे. तर एलॉन मस्क यांचे ध्येय हे मंगळ ग्रहावर उतरण्याचे आहे.
स्टारशीपच्या या उड्डाणापूर्वी अमेरिकेतील फ्लोरिडा येथे अब्जाधीश जेफ बेझोस यांची कंपनी ब्लू ओरीजिनने देकील त्यांचे नवीन रॉकेट न्यू ग्लेनचे उड्डाण केले. हे रॉकेट पहिल्याच उड्डाणात अंतराळातील कक्षेत पोहचले आणि यशस्वीरित्या प्रायोगिक उपग्रह पृथ्वीच्या वर हजारो मैलांवरील कक्षेत प्रस्थापित केला. पण अटलांटा येथील फ्लोटिंग प्लॅटफॉर्मवर त्यांचे फर्स्ट स्टेज बूस्टर अपेक्षित लँडिंग करू शकले नाही आणि हवेतच नष्ट झाले.