ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटचा मालकीहक्क मिळवलेल्या अब्जाधीश एलॉन मस्क यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. एकीकडे ट्विटर खरेदीसाठी त्यांनी तब्बल ४४ अब्ज डॉलर्स मोजलेले असताना दुसरीकडे त्यांनी इलेक्ट्रिक कार निर्मिती करणाऱ्या टेस्ला या कंपनीचे तब्बल ३.९५ अब्ज डॉलर्स किमतीचे १९.५ दशलक्ष शेअर्स विकले आहेत.
एलॉन मस्क यांनी त्यांच्या टेस्ला या कारनिर्मिती करणाऱ्या कंपनीचे तब्बल १९.५ दशलक्ष शेअर्स विकले आहेत. या शेअर्सची किंमत ३.९५ अब्ज डॉलर्स आहे. मस्क यांच्याकडे टेस्ला कंपनीचे सर्वाधिक शेअर्स आहेत. मात्र काही शेअर्स विकण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे पडसाद भांडवली बाजारात उमटले. या निर्णयांतर मस्क यांची संपत्ती २०० अब्ज डॉलर्सच्या खाली घसरली आहे. मालकीहक्क मिळवल्यापासून मस्क ट्विटरमध्ये जास्त व्यस्त आहेत, अशी धारणा भागधारकांची झाली आहे. याच कारणामुळे टेस्ला कंपनीचे शेअर्सही पडले आहेत. भागधारक टेस्लाचे शेअर्स विकत आहेत. टेस्लाचा शेअर मागील ५२ आठवड्यातील निचांकी पातळीवर पोहोचला आहे. संपत्तीत घट झालेली असली तरी जगातील श्रीमंतांच्या यादीत मस्क सर्वोच्च स्थानावर आहेत.
ट्विटरसाठी ४४ कोटींचा करार
दरम्यान, काही दिवसांपूर्वी टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांनी तब्बल ४४ अब्ज डॉलर्सला ट्विटरची खरेदी केली. त्यानंतर मस्क यांनी अनेक निर्णय घेतले. त्यांनी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह काही उच्च अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. त्यानंतर मस्क काय करतीय या विषयी अनेकांच्या मनात भिती होती. नोकर कपातीबाबत अफवा होत्या. मात्र त्या खऱ्या ठरल्या. मस्क यांनी जवळपास ५० टक्के ट्विटर कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. तसेच ट्विटरवर ब्ल्यू टिक हवी असेल तर वापरकर्त्यांना ८ डॉलर्स म्हणजेच जवळपास प्रतिमहिना ६५० रुपये द्यावे लागणार आहेत. मस्क यांनी हा निर्णय नुकताच घेतला आहे.