टेस्ला आणि ट्विटर कंपनीचे मालक इलॉन मस्क सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय असतात. त्यांनी नुकतंच अॅप स्टोअरकडून घेण्यात येणाऱ्या कमिशनवरून अॅपल कंपनीला फटकारलं आहे. अॅपल कंपनीच्या अॅप स्टोअरने अलीकडेच विकसकांकडून शुल्क आकारला सुरुवात केली आहे. त्याप्रकरणी युरोपियन युनियनने नवीन तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीबाबत प्रतिक्रिया देताना इलॉन मस्क म्हणाले की, ‘अॅप स्टोअरकडून शुल्क आकारणे, नक्कीच योग्य नाही.’
“अॅपलकडून अशाप्रकारे शुल्क आकारणे म्हणजे इंटरनेटवर ३० टक्के कर आकारण्यासारखं आहे. जे निश्चितच अयोग्य आहे. “विशेष म्हणजे मस्क हे सुरुवातीपासूनच अॅप स्टोअर कमिशनच्या विरोधात आहेत. आपली असहमती दर्शवताना मस्क म्हणाले की, अॅप स्टोअरकडून आकारली जाणारी रक्कम वास्तविक रक्कमेपेक्षा दहापट अधिक आहे.
गेल्या वर्षी ‘फोर्टनाइट’ या इपिक गेम्स निर्माता कंपनीनं वाढीव कमिशन शुल्कांवरून अॅपल विरोधात खटला दाखल केला होता. यावेळी देखील टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी संबंधित कंपनीला आपला पाठिंबा दर्शवला होता. यावेळी त्यांनी म्हटलं होतं की, आयफोन निर्माता कंपनीने विकसकांकडून ३० टक्के शुल्क आकारणे हे पूर्णपणे अवास्तव आहे. मस्क हे अॅपलच्या नवीन अॅप स्टोअर कमिशनविरोधातील एकमेव व्यक्ती नाहीत. जगभरातील अनेक नियामकांनी अॅपलकडून आकारल्या शुल्काबाबत आक्षेप नोंदवला आहे. तसेच संबंधित निर्णय मागे घेण्यासाठी दबाव आणला जात आहे.
विशेष म्हणजे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी अलीकडेच मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर ४४ अब्ज डॉलर्समध्ये (३ लाख ३७ हजार कोटी रुपयांहून अधिक) खरेदी केली आहे. हा करार या वर्षी पूर्ण होईल. हा करार पूर्ण होताच इलॉन मस्क यांचं ट्विटरवर पूर्ण नियंत्रण असेल आणि ट्विटर ही खासगी कंपनी बनेल. त्यामुळे आता ट्विटरवर मोफत सेवा मिळणार की नाही? हा प्रश्न युजर्संना पडला आहे. याबाबत आता इलॉन मस्क यांनी ट्वीट करून सांगितलं आहे की, या प्लॅटफॉर्मचा व्यावसायिक आणि सरकारी युजर्संना त्याच्या वापरासाठी पैसे खर्च करावे लागतील. तर सामान्य वापरकर्त्यांसाठी ते नि:शुल्क असेल.