Twitter Takeover Updates: टेस्ला मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी सोशल मीडिया कंपनी असलेल्या ट्विटरची १०० टक्के भागीदारी खरेदी करण्यासाठी दिलेला प्रस्ताव कंपनी स्वीकारण्याच्या तयारीत आहे. मस्क यांनी ५४.२० डॉलर प्रतिसमभागाप्रमाणे ट्विटरचे १०० टक्के समभाग सुमारे ४३.३९ अब्ज डॉलरला रोखीत खरेदी करण्याची तयारी दर्शविली होती. अखेर वाटाघाटीनंतर हा सौदा ४४ अब्ज डॉलरला निश्चित करण्यात आल्याचं रॉयर्सने दिलेल्या वृत्तात म्हटलंय. लवकरच यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली जाणार आहे. मात्र हा सौदा निश्चित झाल्याचं मस्क यांनी केलेल्या ट्विटवरुन दिसत आहे.
काही आठवड्यांपूर्वी मस्क यांनी ट्विटरमधील ९.२ टक्के भागभांडवल विकत घेतले होते. त्यांनतर ते ट्विटरमधील सर्वात मोठे भागधारक बनले होते. मात्र त्यांनी कंपनीच्या संचालक मंडळात सहभागी होण्यास नकार दिला होता. ट्विटरच्या खरेदीसाठी प्रस्ताव मांडताना मस्क यांनी आपण कंपनीला सर्वोत्तम आणि शेवटचा प्रस्ताव देत असल्याचे मस्क यांनी सांगितले होती. मस्क यांनी ट्विटर खरेदीसाठी दिलेल्या प्रस्तावानंतर ट्विटरच्या समभागाने ९ टक्क्यांची उसळी घेतली होती. विशेष म्हणजे ट्विटर विकत घेतल्यानंतर मस्क यांनी एक ट्विट करुन आपली भूमिकाही स्पष्ट केलीय.
मुक्तपणे बोलणं, व्यक्त होणं हा लोकशाहीचा कणा आहे. ट्विटर हे असं डिजीटल माध्यम आहे ज्यावर भविष्यात मानवी जीवनावर परिणाम करु शकणाऱ्या गोष्टींबद्दल चर्चा होतात, असं मस्त यांनी म्हटलंय. मस्क यांनी, “मला ट्विटरमध्ये आणखी नवीन फिचर्स आणायचे आहेत. लोकांचा या माध्यमावरील विश्वास वाढवण्यासाठी हे एक ओपन सोर्स अल्गोरिदम असणारं माध्यम करायचं आहे, स्पॅम बोट्स, सर्व व्यक्तींचं ऑथेंटिकेशन अशी बरीच काम डोक्यात आहेत. ट्विटरमध्ये फार क्षमता आहे. मी कंपनीसोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे. तसेच या माध्यमावर असणाऱ्यांसाठी नवीन दारं उघडली जाणार आहेत,” असं म्हणत मस्क यांनी भविष्यातील बदलांचे संकेत दिलेत.
काही आठवड्यांपूर्वी कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केल्यानंतर मस्क यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केलेली. कार्यशील लोकशाहीसाठी अभिव्यक्तिस्वातंत्र्य ही एक सामाजिक गरज आहे. मात्र कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर काही गोष्टी लक्षात आल्या असून कंपनीमध्ये मोठे बदल होणे अत्यावश्यक आहे. याचबरोबर कंपनीची सध्याची कामाची पद्धत बदलण्याची गरज असून ती तशीच ठेवल्यास कंपनीची प्रगती होणे अशक्य आहे. कंपनीमध्ये प्रचंड क्षमता असून कार्यपद्धतीत बदल करणे आवश्यक आहे. मी दिलेल्या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास कंपनीत एक भागधारक म्हणून राहण्याबाबत पुनर्विचार करावा लागेल, असे मस्क यांनी ट्विटरचे अध्यक्ष ब्रेट टेलर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते.
अखेर ट्विटरने मस्क यांनी दिलेला प्रस्ताव मान्य केला असून दोघांमध्ये ४४ अब्ज डॉलरला या कंपनीचा सौदा झाला आहे. त्यामुळे आता मस्क हे ट्विटरमध्ये नेमके कशापद्धतीने बदल घडवून आणतात आणि त्याला लोक कसा प्रतिसाद देतात हे आगामी काळामध्ये स्पष्ट होईल.