इस्रायल आणि हमासमध्ये ७ ऑक्टोबरपासून चालू असलेल्या युद्धामध्ये तह आणि ओलिसांची सुटका होण्याची शक्यता दृष्टीपथात आली आहे. हमासच्या ताब्यात असलेल्या ओलिसांच्या बाबतीत एक चांगली बातमी समोर आली आहे. इस्रायल्या मंत्रिमंडळाने गाझामधील ओलिसांच्या सुटकेसाठी हमासबरोबरच्या एका कराराला मंजुरी दिली आहे. त्यानंतर आता हमासही काही ओलिसांना मुक्त करण्यास तयार झाली आहे. या करारानुसार येत्या चार ते पाच दिवसांमध्ये हमास ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांपैकी ३० हून अधिक लहान मुलं आणि त्यांच्या माता मिळून ५० जणांची सुटका करणार आहे. त्या बदल्यात इस्रायलचं सरकार पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करेल. ओलिसांची आणि कैद्यांची सुटका करण्यासाठी चार दिवसांच्या युद्धविरामाला मंजुरी देण्यात आली आहे.
युद्ध सुरू झाल्यापासून शांततेसाठी आतापर्यंत मिळालेले हे सर्वात सकारात्मक संकेत असल्याचे सांगितले जात आहे. युद्धामध्ये आतापर्यंत १३ हजारांपेक्षा जास्त सामान्य पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला असून त्यामध्ये साडेपाच हजारांपेक्षा जास्त लहान मुलांचा समावेश आहे. युद्धामुळे गाझा पट्टीत भंयकर विध्वंस झाला आहे. इथल्या पॅलेस्टिनी नागरिकांची मदत करण्यासाठी जगभरातील अनेक देश धावून आले आहेत. अशातच जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी ख्याती असलेल्या एलॉन मस्क यांनी गाझासाठी मदत जाहीर केली आहे.
एलॉन मस्क यांनी घोषणा केली आहे की, एक्स (पूर्वीचं ट्विटर) या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवरील जाहिरातींमधून मिळणारा महसूल युद्धग्रस्त गाझा आणि इस्रायलमधील रुग्णालयांना दान केला जाईल. मस्क यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, एक्स कॉर्पोरेशन जाहिराती आणि सदस्यतेच्या (मेंबरशिप) माध्यमातून मिळणारा महसूल गाझा पट्टीतल्या युद्धग्रस्त जनतेच्या सहाय्यतेसाठी, गाझातील आणि इस्रायलमधील रुग्णालयांना दान करेल.
गाझामधील सर्वात मोठं अल-शिफा रुग्णालय आणि इतर काही रुग्णालयांमध्ये गरजेच्या वस्तू नसल्याने ही रुग्णालये सध्या बंद आहेत. या पार्श्वभूमीवर मस्क यांची मदत मिळाल्यानंतर ही रुग्णालये पुन्हा सुरू होऊ शकतात.
हे ही वाचा >> गाझात ४ दिवसांचा युद्धविराम, ५० ओलिसांच्या सुटकेसाठी इस्रायल-हमासमध्ये करार
गाझामधील रुग्णालयांची परिस्थिती बिकट
इस्रायली सैन्याने लक्ष्य केल्यानंतर गाझा पट्टीतील सर्वात मोठय़ा ‘अल-शिफा’ रुग्णालयातून नवजात बालकांना दुसरीकडे हलवण्यात आलं. त्यानंतर इस्रायली फौजांनी सोमवारी आपला मोर्चा उत्तर गाझातील इंडोनेशियन रुग्णालयाकडे वळवला. इस्रायलच्या गणगाड्यांनी या रुग्णालयाला वेढा दिला आहे. यावेळी रुग्णालयाच्या इमारतीवर केलेल्या हल्ल्यात किमान १२ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.