जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून एलॉन मस्क आता सर्वश्रुत झाला आहे. स्पेसएक्स कंपनीचा सहसंस्थापक आणि सीईओ असलेल्या एलॉन मस्कची संपत्ती आता अब्जावधी डॉलर्स झाली आहे. त्यामुळे तो जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरला आहे. त्याच्या संपत्तीमध्ये रोज नव्याने भर पडत असताना एलॉन मस्क आता ‘जॉब’ सोडण्याच्या तयारीत आहे की काय? अशी जोरदार चर्चा नेटिझन्समध्ये रंगू लागली आहे. आणि हे कोणत्याही ऐकीव माहितीवर नसून खुद्द एलॉन मस्कनं स्वत: ट्वीट करून ही इच्छा व्यक्त केली आहे. त्याला आता नव्या क्षेत्रात करीअर करायची इच्छा आहे.
एलॉन मस्कनं आपल्या ट्विटर हँडलवर आज सकाळीच केलेलं एक ट्वीट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. अवघ्या काही तासांमध्ये या ट्वीटला हजारो रीट्वीट आणि २ लाखांहून जास्त लाईक्स मिळाले आहेत. अब्जावधींची संपत्ती असलेल्या एलॉन मस्कला आपण करत असलेलं काम का सोडावसं वाटतंय, असा प्रश्न नेटिझन्सला पडला आहे. त्याचं कारण जरी एलॉन मस्कनं या ट्वीटमध्ये दिलं नसलं, तरी आपण जॉब सोडण्याचा विचार करत आहोत, असं मात्र त्यानं स्पष्टपणे सांगितलं आहे.
“हातात थोडा रिकामा वेळ हवा!”
दरम्यान, अवघ्या काही दिवसांपूर्वीच एका ऑनलाईन परिषदेमध्ये एलॉन मस्कनं अजून काही वर्ष टेस्लाच्या सीईओपदी राहायला आवडेल असं स्पष्टपणे सांगितलं होतं. मात्र, असं सांगताना त्यानं हातात मोकळा वेळ देखील राहायला हवा, असे सूतोवाच केले होते. “सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आठवड्याचे सातही दिवस अगदी दिवसरात्र काम करण्याऐवजी हातात थोडा मोकळा वेळ ठेवायला मला आवडेल. हे भयानक आहे”, असं मस्क म्हणाला होता.
‘त्या’ ट्वीटवरून चर्चेला उधाण
या पार्श्वभूमीवर मस्कनं केलेलं ट्वीट चर्चेचा विषय ठरत आहे. “मी विचार करतोय की आता जॉब सोडून द्यावा आणि पूर्णवेळ सोशल इन्फ्लुएन्सर व्हावं”, असं मस्क आपल्या ट्वीटमध्ये म्हणाला आहे. मात्र, एलॉन मस्क हे नक्की गांभीर्याने म्हणत होता, की विनोद करत होता, याविषयी या ट्वीटमध्ये कोणतेही संदर्भ नाहीत.
..आणि मस्कनं १२ बिलियन डॉलर्सचे शेअर विकून टाकले!
काही दिवसांपूर्वीच मस्कनं अशाच प्रकारे ट्वीट करून टेस्लामधले आपले १० टक्के शेअर विकावेत की नाही, असा प्रश्न नेटिझन्सला विचारला होता. त्यावर बहुतेकांनी सहमती देखील दर्शवली होती. विशेष म्हणजे त्यानंतर मस्कनं टेस्लामधील आपल्या मालकीचे जवळपास १२ बिलियन डॉलर्स किंमतीचे शेअर्स विकले आहेत.