ट्विटर हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकत घेतलेल्यानंतर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क सध्या चर्चेत आहेत. धक्कादायक ट्विटसाठी ओळखले जाणारे इलॉन मस्क हे इंटरनेटवर नेहमीच चर्चेचा विषय असतात. मात्र त्यांनी पहिल्यांदाच आपल्या मृत्यूबद्दल भाष्य केले आहे. मस्क यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे.

यावेळी मस्क यांनी असे काही म्हटले आहे ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये खूप अस्वस्थता निर्माण झाली आहे. “जर माझा मृत्यू गूढ परिस्थितीत झाला, तर तुम्हाला हे जाणून छान वाटेल,” असे टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

इलॉन मस्कचे ट्विट अशा वेळी आले आहे जेव्हा त्यांच्या विरोधात रशियन अधिकाऱ्याचे कथित विधान केले आहे. ज्यामध्ये इलॉन मस्क यांना धमकी देण्यात आली आहे. मस्क यांनी रॉसकॉसमॉस (रशियन स्पेस एजन्सी) चे संचालक दिमित्री ओलेगोविच रोगोझिन यांनी रशियन माध्यमांसमोर केलेले वक्तव्य शेअर केले होते.

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे जवळचे सहयोगी असलेले रोसकॉसमॉसचे प्रमुख ओलेगोविच रोगोझिन यांनी ट्विटरचे नवीन मालक मस्क यांना फटकारले आणि युक्रेनियन सैन्याला लष्करी उपकरणे पुरवल्याबद्दल धमकी दिली आहे. मस्क यांनी शेअर केलेल्या ट्विटनुसार, रोगोझिन म्हणाले की, ३६ व्या युक्रेनियन मरीन ब्रिगेडचे पकडलेले चीफ ऑफ स्टाफ कर्नल दिमित्री कोर्मयान्कोव्ह यांच्या साक्षीवरून असे आढळून आले की मस्क यांचा उपग्रह मारियोपोलमधील युक्रेनियन सैनिकांना इंटरनेट कनेक्शन देत होता.

रोगोझिन यांनी रशियन माध्यमांना सांगितले की, “इलॉन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचे इंटरनेट टर्मिनल लष्करी हेलिकॉप्टरद्वारे नाझी अझोव्ह बटालियनच्या अतिरेक्यांना आणि मारियुपोलमधील युक्रेनियन मरीनपर्यंत पोहोचवले गेले. आमच्या माहितीनुसार, स्टारलिंक उपकरणांची डिलिव्हरी ही पेंटागॉनने केली होती.” रोगोझिन पुढे म्हणाले, “मस्क युक्रेनमधील फॅसिस्ट शक्तींना लष्करी उपकरणे पुरवण्यात गुंतलेले आहेत. त्यासाठी, मस्क यांना जबाबदार धरले जाईल. तू कितीही मूर्ख असलास तरी.”

मस्क यांच्या स्टारलिंक सॅटेलाइट नेटवर्कने कथितरित्या रशियाने यंत्रणा ठप्प करण्याच्या प्रयत्नात वेगाने लढा दिला होता, ज्याची कबुली मस्क यांनी मार्चमध्ये दिली होती. संरक्षण सचिव कार्यालयाचे इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरचे संचालक डेव्ह ट्रेम्पर यांनी गेल्या महिन्याच्या अखेरीस सांगितले की स्टारलिंक अमेरिकेच्या सैन्यापेक्षा अधिक वेगाने हल्ला करण्यास सक्षम आहे आणि अधिकारी मस्ककडून काहीतरी शिकू शकतात.

Story img Loader