Elon Musk 14th Child: न्यूरालिंकच्या एक्झिक्युटिव्ह आणि एलॉन मस्क यांच्या जोडीदार शिवोन झिलीस यांनी चौथ्या बाळाला जन्म दिल्याची घोषणा एक्सवर पोस्टद्वारे केली आहे. झिलीस यांची तिसऱ्या क्रमाकांची मुलगी आर्केडियाचा पहिला वाढदिवस झाल्याच्या निमित्त चौथ्या बाळाची बातमी त्यांनी दिली. या बाळाचे नाव सेल्डन लायकर्गस ठेवल्याचेही त्यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे झिलीस आणि मस्क यांनी तिसऱ्या बाळाची माहिती आजवर जाहीर केलेली नव्हती. सेल्डन हा त्यांचा आता चौथा मुलगा आहे. माध्यमातील बातम्यांनुसार आर्केडियाचा जन्म २०२४ च्या सुरुवातीला झाला होता.
शिवोन झिलीस यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले, “मस्क आणि मी आमच्या मुलाची बातमी सार्वजनिक करत आहोत. आमच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त एलॉन मस्कशी चर्चा करून आम्ही ही बातमी देत आहोत. आमच्या मुलाचे सेल्डन लायकर्गस ठेवले आहे.”
एलॉन मस्क यांनीही या पोस्टच्या खाली हृदयाचे इमोजी टाकून रिप्लाय दिला आहे.
टेस्ला कंपनीचे प्रमुख एलॉन मस्क यांनी आतापर्यंत १२ मुलांना जन्म दिल्याचे बोलले जात होते. त्यापैकी शिवोन झिलीस यांनी आता तिसऱ्या आणि चौथ्या बाळाची माहिती दिली आहे. याआधी त्यांना दोन जुळी मुले आहेत.
काही दिवसांपूर्वी एन्फ्लुएन्सर अॅशले सेंट क्लेअर पाच महिन्यांपूर्वी मस्क यांच्या बाळाला जन्म दिल्याचा दावा केला. क्लेअरची एक्स पोस्ट सध्या सर्वत्र व्हायरल झाली होती. तसेच मस्क यांची जोडीदार ग्रिम्स यांनी त्यांच्या मुलाच्या वैद्यकीय गरजांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही केला होता.
एलॉन मस्क यांचा वडिल म्हणून इतिहास गुंतागुंतीचा आहे. २००२ मध्ये त्यांना पहिली पत्नी जस्टीन विल्सनकडून नेवाडा अलेक्झांडर मस्क हा मुलगा झाला होता. मात्र त्याचे निधन झाले. त्यानंतर आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे त्यांना जुळी आणि तिळी मुले झाली. त्यानंतर संगीतकार ग्रिम्स यांच्याकडून त्यांना तीन मुले झाली.