Elon Musk X Post On Weekend Work : अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांनी “वीकेंडलाही काम करणे ही एक सुपरपॉवर आहे” असा दावा केला. मस्क यांच्या या दाव्यानंतर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वर्क लाइफ बॅलन्सची पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी एल अँड टी च्या अध्यक्षांनी कर्मचाऱ्यांनी रविवारीही काम करावे असे म्हटल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. आता मस्क यांच्या विधानाने याची पुन्हा चर्चा होत आहे.

एलॉन मस्क यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की,”खूप कमी नोकरदार लोक प्रत्यक्षात वीकेंडला काम करतात, त्यामुळे असे वाटते की विरोधी संघ फक्त दोन दिवसांसाठी मैदान सोडतो! वीकेंडला काम करणे म्हणजे एक सुपरपॉवर आहे.”

कोटक महिंद्रा एएमसीचे एमडी नीलेश शाह यांनी एलॉन मस्क यांच्या पोस्टवर कमेंट केली आहे. त्यांनी म्हटले की, “मस्क यांच्या पोस्टवरील प्रतिक्रिया पाहणे मनोरंजक ठरणार आहे. एनआरएम (नारायण मूर्ती) आणि एसएनएस (एसएन सुब्रह्मण्यम) दोघांनाही कामकाजाच्या तासांवरील त्यांच्या विधानांमुळे टीका सहन करावी लागली होती. मूर्ती यांनी भारताच्या विकासासाठी ७० तासांच्या कामाच्या आठवड्याचा प्रस्ताव मांडला होता, तर सुब्रह्मण्यम यांनी ९० तासांच्या कामाच्या आठवड्याचा प्रस्ताव मांडला होता. या दोघांवरही मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.”

काय म्हणाले होते एल अँड टी चे अध्यक्ष?

सोशल मीडियावर गेल्या महिन्यात व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एसएन सुब्रह्मण्यम यांना कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना विचारण्यात आले होते की, अब्जावधी डॉलर्सची उलाढाल असलेली लार्सन अँड टुब्रो कंपनी अजूनही कर्मचाऱ्यांना शनिवारी का काम करायला लावत आहे.

याला उत्तर देताना ते म्हणाले होते की, “रविवारी मी तुम्हाला काम करायला लावत नाही याचा मला पश्चात्ताप वाटतो. जर मी तुम्हाला रविवारीही काम करायला सांगितले तर मला जास्त आनंद होईल, कारण मीसुद्धा रविवारी काम करतो.” ते पुढे म्हणाले की, “घरी बसून तुम्ही काय करता? तुम्ही तुमच्या पत्नीकडे किती वेळ पाहणार? पत्नी तुमच्याकडे किती वेळ पाहणार? त्यापेक्षा कार्यालयात या आणि कामाला लागा.”

Story img Loader