मागील अनेक दिवसांपासून ट्विटर ही मायक्रोब्लॉगिंग साईट वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. मात्र आता ट्विटर वापरकर्त्यांची चिंता वाढवणारी माहिती समोर येत आहे. २०० दसलक्षपेक्षा अधिक ट्विटर वापरकर्त्यांचा इमेल अॅड्रेस लीक झाला असून तो एका ऑनलाईन हॅकिंग फोरमवर पब्लिश करण्यात आला आहे, असा दावा एका सिक्योरिटी रिसर्चरने केला आहे. मात्र या दाव्यावर ट्विटरने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण किंवा प्रतिक्रिया दिलेली नाही.
हेही वाचा >>> “थेट शूट करण्याऐवजी माझा अपघात घडवून आणला जाऊ शकतो,” सुषमा अंधारेंच्या विधानामुळे खळबळ
नेमका दावा काय आहे?
जवळपास २०० दसलक्षपेक्षा अधिक ट्विटर वापरकर्त्यांचे मेल अॅड्रेस लीक झाल्याचा दावा करण्यात येत आहे. याबाबत इस्रायली सायबर सिक्योरिटी मॉनिटरिंग फर्म हडसन रॉकचे सहसंस्थापक अलॉन गल यांनी लिंक्डइनवर सविस्तर माहिती दिली आहे. “या घटनेमुळे हॅकिंग, टार्गेटेड फिशिंग आणि डॉक्सिंग याला बळ मिळणार आहे. ही एक महत्त्वपूर्ण घटना आहे,” असे अलॉन गल म्हणाले आहेत.
हेही वाचा >>> महिलेच्या अंगावर लघुशंका प्रकरण : DGCA ने एअर इंडियाला फैलावर घेतलं; म्हणाले, “हा प्रकार…”
या मेल अॅड्रेस लिकबाबत अलॉन गल यांनी २४ डिसेंबर रोजी सोशल मीडियावर पोस्ट केलीहोती. मात्र ट्विटरने अद्याप या दाव्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच ट्विटरने या दाव्यानंतर कारवाईला सुरुवात केली आहे की नाही, याबाबतही अद्याप अस्पष्टता आहे.
दरम्यान, या मेल आयडी अॅड्रेसच्या कथित लिकसंदर्भात अधिक माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. तसेच या घटनेमागील हॅकर्सचीही माहिती मिळालेली नाही. अब्जाधीश एलॉन मस्क यांनी ट्विटरवर ताबा मिळवण्याच्या अगोदर म्हणजेच २०२१ साली सुरुवातीच्या काळात ही हॅकिंग झाली असावी, असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे.