बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हेलिकॉप्टरचे गया येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. नितीश कुमार राज्यातील दुष्काळीस्थितीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर होते. मात्र, खराब हवामानामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. या घटनेनंतर गया प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती.
दुष्काळग्रस्त भागाची पहाणी दौऱ्यादरम्यान घटना
बिहारमध्ये पावसाच्या कमरतेमुळे भीषण दुष्काळ ओढावला आहे. कमी पर्जन्यमानामुळे अनेक जिल्ह्यांतील पीके उद्ध्वस्त झाली आहेत. नव्याने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार दुष्काळ भागाच्या पहाणी दौऱ्यावर होते. जहानाबाद, अरवल यांसह अन्य जिल्ह्यांमध्ये ते हवाई पाहणी करणार होते. मात्र, खराब हवामानामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले.
नितीश कुमार रस्तेमार्गे पटणाला जाणार
गया येथे नितिश कुमारांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आल्याच्या वृत्ताला गयाचे जिल्हाधिकारी डॉ. त्यागराजन यांनी दुजोरा दिला आहे. हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्यानंतर गया जिल्हा प्रशासनाची धावपळ उडाली होती. जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकारी विमानतळावर पोहोचले. आता नितीश कुमार रस्तेमार्गे पाटणा येथे जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.