दिल्लीहून जबलपूर निघालेल्या स्पाईसजेट विमानाला उड्डाणानंतर काहीच वेळातच पुन्हा खाली उतरवण्यात आले. उड्डाणानंतर विमानात धुराचे लोट पसरले होते. त्यामुळे विमानाला पुन्हा दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून धूर निघाल्यानंतर विमानातील प्रवाश्यांमध्ये गोंधळ उडाला होता.
वृत्तानुसार, स्पाइसजेटच्या या विमानात ५० हून अधिक प्रवासी होते. विमान सुमारे ५००० फूट उंचीवर गेल्यावर विमानात अचानक धूर येऊ लागला. प्रवाशांना सुरुवातीला काय झाले ते समजले नाही, मात्र धूर वाढल्याने लोकांना श्वास घ्यायला थोडा त्रास होत होता. त्यामुळे विमानातील प्रवासी हाताचा पंखा करून धूर बाजूला करत होते.
या अगोदरही लागली होती आग
याआधीही १९ जून रोजी पाटणाहून दिल्लीला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात आग लागल्याची माहिती स्थानिक लोकांनी पाटणा विमानतळ आणि स्थानिक अधिकाऱ्यांना दिली होती. त्यामुळे विमानाला परत पाटणा येथे उतरावे लागले. त्यामागे तांत्रिक बिघाड असल्याचे कारण समोर आले. विमानातील सर्व १८५ प्रवाशांना स्पाइसजेटमधून सुखरूप बाहेर काढण्यात आले होते.