Arvind Kejriwal CBI inquiry : मद्यविक्री धोरण गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चौकशी सुरू केली आहे. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया याप्रकरणी आधीच तुरुंगात आहेत. आता अरविंद केजरीवाल यांचीही चौकशी सुरू केल्याने आपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. देशभर विविध ठिकाणी या चौकशीविरोधात कार्यकर्त्यांकडून आंदोलने केली जात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर पुढील रणनीती आखण्याकरता आम आदमी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली आहे. मनीष सिसोदियांप्रमाणेच अरविंद केजरीवाल यांनाही अटक होऊ शकते, अशी भीती आपच्या नेत्यांनी वर्तवली आहे.
हेही वाचा >> “जर मी चोर असेन, तर मग या पृथ्वीतलावर कुणीच…”, अरविंद केजरीवाल यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल!
आपचे संयोजक गोपाल राय यांनी ट्वीट करत या आपत्कालीन बैठकीची माहिती दिली. या बैठकीला आपचे राष्ट्रीय सचिव पंकज गुप्ता, महापौर शेली ऑबेरॉय आणि उपमहापौर आले इक्बाल उपस्थित आहेत.
“सीबीआय मुख्यालयाजवळ शांतीपूर्वक आंदोलन करणाऱ्या कॅबिनेट मंत्री आणि खासदारांना अचानक ताब्यात का घेतलं गेलं? मोदी लोकशाहीची हत्या करण्यासाठी का उतरले आहेत? पुढील रणनीती आखण्याकरता पक्षाच्या मुख्यालयात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे”, असं ट्वीट गोपाल राय यांनी केलं.
आज सकाळपासूनच अरविंद केजरीवाल यांची सीबीआय चौकशी सुरू आहे. सीबीआयच्या दिल्लीतील मुख्य कार्यालयाबाहेर आपच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला आहे. पोलिसांकडून या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. राघव चढ्ढा,संजय सिंह यांच्यासह आम आदमी पक्षाचे अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी सीबीआय कार्यालयाजवळ निदर्शने केली. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
“भाजपाला केजरीवाल यांची भीती वाटतेय. पण आम्ही तुरुंगाला घाबरत नाही. केजरीवालांची भीती वाटत असल्यानेच भाजपाला अशा कारवाया कराव्या लागत आहेत”, अशी प्रतिक्रिया आपचे नेते राघव चढ्ढा यांनी दिली.
सीबीआयच्या चौकशीला जाण्याआधी अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील राजघाट येथे जाऊन महात्मा गांधी यांना अभिवादन केले. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, आपचे खासदार संजय सिंग यांच्यासह आपचे अनेक वरिष्ठ नेते अरविंद केजरीवाल यांच्यासोबत गेले आहेत.