Delhi-Mumbai Expressway Road caved: मुंबई-दिल्ली महामार्ग खचला असून अनेक वाहनांचा अपघात झाला आहे. हा महामार्ग बांधणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्याने रस्ता खचल्याबद्दल उंदरांना जबाबदार धरले होते. केसीसी बिल्डकॉन या कंपनीचा कनिष्ठ कर्मचारी असलेल्या एका कर्मचाऱ्याने सांगितले होते की, उंदरांमुळे महामार्ग खचला. या विधानामुळे वाद निर्माण झाल्यानंतर आता कंपनीने सदर कर्मचाऱ्याची हकालपट्टी केली आहे.
हकालपट्टी केलेल्या कर्मचाऱ्याला महामार्गाच्या बांधणीचे कोणतेही तांत्रिक ज्ञान नव्हते. त्याने केलेली टिप्पणी अतिशय चुकीची होती, त्यामुळे त्याला काढून टाकण्यात आले असल्याचे कंपनीने आपल्या निवेदनात सांगतिले. तसेच हा कर्मचारी मेन्टेनन्स व्यवस्थापक नव्हता, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. “उंदीर किंवा छोट्या प्राण्याने हा खड्डा केला असावा. ज्यामुळे पाणी झिरपून मोठा खड्डा पडला असावा”, अशी टिप्पणी या कर्मचाऱ्याने केली होती.
दरम्यान या प्रकल्पाचे दौसा येथील संचालक बलवीर यादव यांनी सांगितले की, पाणी झिरपल्यामुळे हा खड्डा पडला असावा. रस्त्यावर खड्डा पडल्याची माहिती मिळाल्यानंतर कंत्राटदाराने लगेच खड्ड्याच्या ठिकाणी बॅरिकेड लावले. तसेच खड्डाही तात्काळ भरण्यात आला, अशी माहिती यादव यांनी दिली.
पंतप्रधान मोदींनी केले होते उदघाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ ऑक्टोबर २०२३ रोजी या महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे अनावरण केले होते. या दुसऱ्या टप्प्यात राजस्थानमधील ३७३ किमी, मध्यप्रदेशमधील २४४ किमी आणि हरियाणामधील ७९ किमी टप्प्याचे अनावरण झाले होते. तर सोहना-दौसा हा टप्पा आधीपासूनच कार्यरत होता.
महामार्गाची लांबी किती?
मुंबई-दिल्ली महामार्ग १,३८६ किमींचा असून भारतातील सर्वात मोठा महामार्ग आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि हरियाणा या राज्यातून हा महामार्ग जातो. ३१ जुलै रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत माहिती देताना सांगितले की, या प्रकल्पाचे ८० टक्के काम झाले असून वर्षभरात महामार्गाचे काम पूर्ण होईल.
© IE Online Media Services (P) Ltd