Viral Post:कामाच्या ठिकाणी येणारी आव्हाने सर्वांसमोर मांडण्यासाठी रेडिट हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मोठे व्यासपीठ बनले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक युजर्सनी त्यांना कामाच्या ठिकाणी येणारी आव्हाने आणि होणाऱ्या त्रासाबद्दल व्यथा मांडल्या आहेत. अशात आता, एका कर्मचाऱ्याने अलीकडेच त्यांच्या सहकाऱ्याला ओव्हरटाइन न केल्यामुळे कसे कामावरून काढले याबद्दलची घटना शेअर केली आहे. या कर्मचाऱ्याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, कंपनीने बजेटची समस्या असल्याचे सांगत ओव्हरटाईम काम करण्यास नकार दिला त्यामुळे एका सहकार्याला राजीनामा देण्यास सांगितले.

‘सहकाऱ्याला आज ओव्हरटाईम करण्यास नकार दिल्याने कामावरून काढून टाकण्यात आले’ या शीर्षकाखाली लिहिलेल्या पोस्टमध्ये, रेडिट युजरने म्हटले की, “मी एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करतो, ही उत्पादन-आधारित क्षेत्रातील एक प्रसिद्ध कंपनी. येथील कामाची संस्कृती उत्तम आणि लवचिक आहे व बहुतेक कर्मचारी येथे दीर्घकाळापासून काम करत आहेत. काहीजण तर २६-२७ वर्षांपासून इथे कामाला आहेत.”

माझा दृष्टिकोन बदलला

“पण, आज घडलेल्या एका घटनेनंतर कंपनीबद्दलचा माझा दृष्टिकोन बदलला. माझी एका टीममेट, जी कंपनीत ३.५ वर्षांपासून काम करत आहे, तिला बजेटच्या समस्यांमुळे राजीनामा देण्यास सांगण्यात आले. मी तिला अश्रू ढाळत ऑफिसमधून बाहेर पडताना पाहिले. मला हे विचित्र वाटले. कारण जर बजेटची समस्या खरोखरच असती तर फक्त एका व्यक्तीला नाही तर अधिक लोकांना कामावरून काढायला हवे होते,” असेही या युजरने पोस्टमध्ये म्हटले आहे.

टीममेट स्पष्ट बोलायची…

या युजरने पोस्टमध्ये असेही म्हटले की, “टीममेट स्पष्ट बोलायची आणि कधीकधी जास्त काम करण्यास नकार द्यायची. जे इतर कर्मचारी एकही शब्द न बोलता स्वीकारायचे. ओव्हरटाइम न करणे तिला कामावारून काढून टाकण्यामागचे कारण असू शकते का? मला खात्री नाही, पण त्यामुळे मला अस्वस्थ वाटत आहे. जर पुढे माझ्यासोबत असे घडले तर काय होईल?”

पोस्ट शेअर केल्यापासून, याल १,४०० हून अधिक अपव्होट्स मिळाले आहेत. त्यामुळे वर्क लाइफ बॅलेन्सबद्दल चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.