7 Words Resignation Letter : नव्या आर्थिक वर्षात सर्वांना पगारवाढीची अपेक्षा असते. काहीजण पगारवाढ झाल्यानंतर कंपनी बदलण्याच्या विचारात असतात. वाढीव पगाराच्या आधारावर इतर कंपनीत अधिक पगाराची अपेक्षा करतात. अर्थात या काही गैर नाही. पण कंपनीच्या नियमांनुसार जर तुम्ही राजीनामा देऊन, तुमचे नोटीस पीरिअड पूर्ण करून कंपनी सोडलीत तर तुमच्यावर कोणतीही कारवाई होऊ शकत नाही. परंतु, तुम्ही अचानक गायब झालात अन् अचानक तुमचा राजीनामाच कंपनीला प्राप्त झाला तर? एका नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्याने असाच प्रकार केला आहे. अवघ्या सात शब्दांत त्याने त्याचा राजीनामा कंपनीपर्यंत पोहोचवला आहे.
कंपन्या बदलताना किंवा नोकरी सोडताना प्रत्येकाला सध्याच्या कंपनीत राजीनामा पत्र (Resignation Letter) द्यावं लागतं. या राजीनाम्यात कंपनी सोडण्याचे कारण अन् कर्मचाऱ्याच्या कार्यकाळात पर्यवेक्षक आणि सहकाऱ्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. त्यामध्ये अनेकदा संपर्कात राहण्याचे आश्वासन दिले जाते आणि कधीकधी भविष्यातील सहकार्यासाठी आश्वासनही दिलं जातं. काहीजणांचे राजीनामा पत्र अगदीच संक्षिप्त असतात, पण अनेकदा अनेकजण सविस्तर राजीनामा पत्र लिहितात.
सात शब्दांच्या राजीनाम्यात काय लिहिलंय?
अलिकडेच, एका कर्मचाऱ्याने एक वेगळाच मार्ग पत्करला. त्याच्या राजीनाम्याच्या पत्रात फक्त सात शब्द होते. “धर्मादाय अकाऊंटींग माझ्यासाठी नाही. मी राजीनामा देतो.” असं त्याने एका कोऱ्या कागदावर हस्ताक्षराने लिहिलं होतं. यामध्ये कोणत्याही प्रकारचे इतर स्पष्टीकरण नव्हतं.

हेच राजीनामा पत्र आता रेडिटवर व्हायरल होत आहे. आमचा नवा कर्मचारी गेले काही दिवस बेपत्ता होता. नंतर आम्हाला त्याच्या डेस्कवर हे पत्र सापडलं, असं कॅप्शन देऊन एकाने हे पत्र रेडिटवर शेअर केलंय. यावर अनेक प्रतिक्रिया दिल्या असून अनेकांनी त्यांचेही अशासंदर्भातील अनुभव शेअर केले आहेत.
चार दिवसांपूर्वी केलेल्या पोस्टवर आतापर्यंत हजारो कमेंट्स आल्या असून १२ हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत.