केंद्र सरकार राबवू पाहणाऱ्या कामगारविषयक सुधारणांना तीव्र विरोध करण्यासाठी देशातील १० विविध कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.  मुंबईत लोकल आणि बेस्टसेवा सुरळीत सुरू आहे. मात्र, रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी संपात सहभाग घेतल्यामुळे मुंबईकरांचे काही प्रमाणात हाल झाले. तर राज्यात संपातील सहभागास मनाई करणारा सरकारचा आदेश धुडकावून शासकीय कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा बंद पुकारला. प्रामुख्याने राज्यभरातील तृत्तीय व चतुर्थश्रेणीचे कर्मचारी मोठय़ा संख्येने बंदमध्ये सहभागी झाले आहेत. शासकीय रुग्णालयांमधील परिचारिकाही संपात उतरल्याने त्याचा आरोग्य सेवेवर परिणाम झाला. राज्याबाहेर या संपाचे तीव्र पडसाद पाहायला मिळत आहेत. कोलकाता, हैदराबाद, तेलंगणा येथील रिक्षा, टॅक्सी आणि बससेवा ठप्प पडल्याले जनजीवन विस्कळीत झाले. तर बिहारमध्ये आरा येथे रेलरोको करण्यात आले. राजधानी दिल्लीत देखील संपामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.  संपावर असलेल्या रिक्षाचालकांना मारझोड झाल्याचीही माहिती समोर आली आहे.  पश्चिम बंगालमध्ये बंद पाठिंबा देणारे डावे आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये काही ठिकाणी संघर्ष उफाळून आला. त्यामुळे पोलिसांना सौम्य प्रमाणात लाठीमार करावा लागला. निर्मिती तसेच वाहतूक क्षेत्राशी संबंधित वर्गही या एकदिवसीय संपात सहभागी झाल्याने अर्थ व्यवहारांना खीळ बसली आहे.
दरम्यान, कामगार संघटनेच्या नेत्यांबरोबर यापूर्वी दोन वेळा चर्चा करणाऱ्या सरकारने संप मागे घेण्याचे ऐनवेळचे आवाहन मंगळवारीही केले होते. केंद्रातील मोदी सरकारच्या कामगारविषयक सुधारणांबाबतच्या तरतुदींना १० मोठय़ा कामगार संघटनांनी विरोध केला आहे. याच्याच निषेधार्थ आज एक दिवसाच्या देशव्यापी ‘भारत बंद’ची हाक कामगार वर्गाकडून देण्यात आली. बँक क्षेत्रातील १० लाख तर विमा क्षेत्रातील २ लाख कर्मचारीही त्यात सहभागी झाले आहेत.  सत्ताधारी भाजपशी संबंधित भारतीय मजदूर संघाने या संपातून बाहेर पडण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला आहे.

Story img Loader