पीटीआय, नवी दिल्ली

रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढत राहण्यासाठी केंद्र सरकार पावले उचलत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. केंद्र सरकारच्या विविध विभागांमधील ५१ हजारहून अधिक रिक्त पदांना नियुक्तिपत्रांचे वाटप केल्यानंतर रोजगार मेळाव्याच्या १५व्या आवृत्तीला ते दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करीत होते.

हा तरुणांसाठी अभूतपूर्व संधीचा काळ असल्याचे ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ)च्या अहवालाचा दाखला देत भारत सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था राहणार असून प्रत्येक क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढणार असल्याचे ते म्हणाले. वाहन आणि पादत्राणे उद्याोगातील उत्पादन आणि निर्यातीने नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला असल्याची माहितीदेखील पंतप्रधानांनी या वेळी दिली.

२०१४ पूर्वी आंतर्देशीय जलमार्ग वाहतूक १८ दशलक्ष टन होती ती आज १४५ दशलक्ष टनापर्यंत वाढली असल्याचे व राष्ट्रीय राष्ट्रीय जलमार्गांची संख्या ५वरून ११०पर्यंत वाढली असून त्यांची लांबी २७०० कि.मी.वरून ५००० कि.मी.पेक्षा जास्त झाली असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

महिलांचा सहभाग वाढला

विकास सर्वसमावेशक झाला असून प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढला असल्याचेदेखील पंतप्रधानांनी अधोरेखित केले. यंदाच्या यूपीएससी परीक्षेतील पाच अव्वलमध्ये तीन महिलांचा समावेश असल्याचा उल्लेखदेखील त्यांनी केला.

ते म्हणाले की ९० लाखांहून अधिक बचत गटांमध्ये १० कोटींहून अधिक महिला काम करत आहेत. नोकरशाहीपासून ते अवकाश आणि विज्ञानापर्यंतच्या क्षेत्रात भारताची महिला शक्ती शिखर गाठत आहे आणि सरकार ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणावरही भर देत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.या वेळी त्यांनी ‘व्हेव्ह्ज’ परिषदेचा उल्लेखदेखील केला.

‘व्हेव्ह्ज’ परिषदेचा उल्लेख

– स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया आणि डिजिटल इंडिया यांसारख्या उपक्रमांमध्ये तरुणांसाठी नवीन संधी निर्माण होत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी खुले व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे.

– समर्पण आणि कल्पकतेद्वारे भारतातील तरुण देशामध्ये असलेली अफाट क्षमता जगाला दाखवत आहेत.

– मुंबईत होणारी वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (व्हेव्ह्ज) ही तरुणांसाठी जागतिक व्यासपीठावर आपली कौशल्ये सादर करण्याची उत्तम संधी असेल.

– ‘उत्पादन मोहीम’ देशभरातील लाखो सूक्ष्म, लघु उद्याोग आणि लहान उद्याोजकांना केवळ पाठिंबाच देणारी नाही तर देशभरात रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण करतील.

या दशकात तरुणांनी भारताच्या तंत्रज्ञान, विदा आणि नावीन्यपूर्ण विकासाला चालना दिली आहे. डिजिटल व्यवहारांमध्ये देश अग्रेसर आहे. जेव्हा तरुण राष्ट्र उभारणीसाठी सक्रियपणे योगदान देतात तेव्हा देशाला वेगवान विकासाचा अनुभव येतो आणि जागतिक व्यासपीठावर ओळख मिळते. देशातील तरुणांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी सतत वाढत राहतील याची काळजी केंद्र सरकार प्रत्येक टप्प्यावर घेत आहे.– नरेंद्र मोदी, पंतप्रधान