सिरियात जिहाद पुकारलेल्या अतिरेक्यांवर हवाई हल्ले चढविण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या वैमानिकांच्या पथकात संयुक्त अरब अमिरातीच्या एका महिला वैमानिकाचाही समावेश आहे. मेजर मरियम अल्-मन्सुरी असे या वीरांगनेचे नाव असून ती ३५ वर्षांची आहे. अमिरातीने अधिकृतपणे मात्र ही घोषणा केलेली नाही. मरियम या लढाऊ जेट चालविणाऱ्या अमिरातीतील पहिल्या महिला वैमानिक आहेत. एफ-१६च्या वैमानिक म्हणूनही त्यांनी आपले कौशल्य सिद्ध केले आहे.
८९ चालकांचे परवाने रद्द
नवी दिल्ली : दारू पिऊन वाहन चालविल्यामुळे दिल्ली वाहतूक विभागाने ८९ वाहनचालकांचे परवाने रद्द केले आहेत. महिनाभरापूर्वी तब्बल ७०० वाहन चालकांचे परवाने याच कारणास्तव रद्द करण्यात आले होते. दारू पिऊन गाडी चालवताना दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा पकडल्या गेलेल्या चालकांवर ही कारवाई होते. या ८९ जणांना त्यांची बाजू मांडण्यासाठी दहा दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
५९६ गावांत शहरी सुविधा
रायपूर : ग्रामविकास योजनेच्या माध्यमातून छत्तीसगढ सरकार ५९६ खेडय़ांमध्ये शहरी सुविधा पुरविणार आहे. तीन ते पाच हजार लोकसंख्या असलेल्या आणि शिक्षणात प्रगती केलेल्या तसेच मागासवर्गीयांची संख्या अधिक असलेल्या खेडय़ांची निवड या योजनेसाठी करण्यात आली आहे. राष्ट्रीय मार्गापर्यत बससेवा, एटीएम केंद्र आणि वाचनालये या सुविधांचा या योजनेत समावेश आहे.
१०९ बालजवानांची म्यानमारमध्ये मुक्तता
यंगून : म्यानमार लष्कराने आपल्या सैन्यातून गुरुवारी १०९ बालजवानांची सुटका केली. संयुक्त राष्ट्रांनी ही घोषणा केली. लष्करात भरती केल्या गेलेल्या लहान मुलांची मुक्तता करावी तसेच लष्करात मुलांची भरती करू नये, असा करार म्यानमार आणि संयुक्त राष्ट्रांमध्ये २०१२ मध्ये झाला आहे. त्यानुसार ही कार्यवाही सुरू असून आजवर ४७२ बालजवानांची सुटका झाली आहे.
गाडीचे दार बंद न केल्याने घटस्फोट!
जेद्दा : गाडीचे दार बंद करण्यास नकार दिल्यावरून सौदी अरेबियात एका पतीने आपल्या पत्नीस घटस्फोट दिला आहे. सहलीवरून परतल्यावर गाडीतून उतरून आणि मुलांना घेऊन ही महिला घरात निघून गेली आणि दरवाजे बंद करण्यासाठी बोलावूनही ती न आल्याने  या पतीने घटस्फोटाची मजल गाठली. सौदी अरेबियात दरवर्षी ७० हजार विवाहांची नोंदणी होते आणि १३ हजार घटस्फोट होतात.

Story img Loader