ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ (दुसऱ्या) यांनी मंगळवारी इतिहासाचा एक नवा अध्याय रचला. ब्रिटिश मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहून त्यांनी सर्वाना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. ब्रिटिश राजघराण्यातील व्यक्तीने मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित राहण्याची ही १७८१ नंतरची पहिलीच घटना आहे.
राणी एलिझाबेथ यांनी राज्यकारभाराची सूत्रे हाती घेण्याच्या घटनेचे यंदा हीरकमहोत्सवी वर्ष आहे. या साठाव्या उत्सवी वर्षांच्या पाश्र्वभूमीवर मंगळवारी त्यांनी मंत्र्यांची भेट घेतली. ब्रिटिश राजघराणे लोकशाही व्यवस्थेत ढवळाढवळ करत नसल्याने ८६ वर्षीय एलिझाबेथ यांच्या आगमनाचे सर्व मंत्र्यांना अप्रूप वाटले. पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी राणीचे स्वागत केले. पंतप्रधान कॅमेरून आणि परराष्ट्र सचिव विल्यम हॉग यांच्या मधोमध बसून त्यांनी मंत्र्यांशी संवाद साधला. या वेळी सर्व मंत्र्यांचा त्यांना परिचय करून देण्यात आला. राजघराण्याची झूल बाजूला सारत एलिझाबेथ यांनी या मंत्र्यांशी नर्मविनोदी शैलीत संवाद साधला, त्यांना काही चुटकेही सांगितले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
या राणीचे वडील किंग जॉर्ज सहावे हे दुसऱ्या महायुद्धादरम्यान मंत्रिमंडळाच्या एका तातडीच्या बैठकीत सहभागी झाले होते, मात्र राजघराण्यातील व्यक्तीने शांतिपर्वात मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी होण्याची १७८१नंतरची ही पहिलीच घटना आहे.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा