जम्मू-काश्मीरच्या हंडवाडा परिसरात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे तीन जवान आणि दोन स्थानिक पोलिस शहीद झाल्याचं वृत्त आहे. यामध्ये एका स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाल्याचंही समजतंय. याशिवाय नऊ जवान जखमी झाल्याचीही माहिती आहे. दरम्यान, या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांना दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं आहे. सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारपासून चकमक सुरू आहे. कुपवाडामध्ये झालेल्या चकमकीत चार जवान शहीद झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली आहे. घटनास्थळी अद्यापही सुरक्षा दलांकडून ऑपरेशन सुरू असल्याची माहिती आहे.


जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हंडवाडाच्या बाबागुंड परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर शोधमोहिम सुरू होती. दहशतवादी रहिवाशी इमारतीत लपल्याची माहिती मिळाल्याने सुरक्षा दलांचा त्या दृष्टीकोनातून तपास सुरू असतानाच एका इमारतीतून दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यांच्या गोळीबाराला सुरक्षा दलानेही चोख प्रत्युत्तर दिलं. यामध्ये आतापर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती मिळाली आहे. पण त्यासोबतच 3 सीआरपीएफ जवान आणि 2 पोलिसांनाही वीरमरण आले आहे. वृत्तसंस्था एएनआयने याबबातचं वृत्त दिलं आहे. इमारतीतीतल सर्व दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, मात्र अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.

Story img Loader