पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणातील दोन संशयित शार्पशूटर आणि पंजाब पोलिसांच्या तुकडीमध्ये बुधवारी दुपारी दोनच्या सुमारा गोळीबार सुरु झाल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. पंजाबमधील अमृतसरजवळच्या गावात ही चकमक सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस आणि संशयितांमध्ये सुरु असणाऱ्या चकमकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांना घरातच थांबण्याच्या सूचना सुरक्षा यंत्रणांनी दिल्या आहेत.
अटारी सीमेजवळच्या भाकना कालन गावामध्ये ही चकमक सुरु असून गावातील एका बंगल्यामध्ये हल्लेखोर लपल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी या बंगल्याला सर्व बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या ठिकाणी ही चकमक सुरु आहे तो भाग भारत पाकिस्तान सीमेपासून जवळ असल्याने हे हल्लेखोर पाकिस्तानमध्ये पळून जाण्याच्या तयारीतही असल्याची शक्यता एका माजी पोलीस अधिकाऱ्याने एनडीटीव्हीशी बोलताना व्यक्त केलीय.
जगरुप रोपा आणि मनप्रित कुसा असं या दोन संशयित हल्लेखोरांची नावं असून यापैकी एका हल्लेखोराने सर्वात आधी एके-४७ मधून मुसेवाला यांच्यावर गोळीबार केल्याचं सांगितलं जात आहे.
सिद्धू मुसेवालांवर ३० गोळ्या झाडल्या…
पंजाबच्या मन्सा जिल्ह्यात २९ मे २०२२ रोजी सायंकाळी जवाहरके गावात सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सिद्धू मुसेवाला आपल्या काळ्या रंगाच्या थार गाडीमध्ये दोन मित्रांसहीत प्रवास करत असताना हा हल्ला करण्यात आला. गुरविंदर सिंग आणि गुरप्रीत सिंग यांच्यासोबत जात असतानाच सिद्धू मुसेवालाच गाडी चालवत होते. घरापासून काही अंतरावर असताना अचानक सिद्धू मुसेवाला यांच्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला.
सिद्धू मुसेवाला यांना चार शसस्त्र सुरक्षारक्षकांची सुरक्षा पुरवण्यात आलेली. या सुरक्षेमध्ये २८ मे रोजी कपात करुन पंजाबमध्ये नव्याने सत्तेत आलेल्या भगवंत मान सरकारने केवळ दोन सुरक्षारक्षक त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात केलेले. सिद्धू मुसेवाला यांच्याकडे बुलेटप्रूफ फॉर्चूनरही आहे. मात्र ज्या दिवशी हा हल्ला झाला त्या दिवशी सिद्धू मुसेवाला हे सुरक्षारक्षकांशिवाय आपल्या थार जीपने दोन मित्रांसोबत प्रवास करत होते.
सिद्धू मुसेवाला यांचे वडील बलकौर सिंग यांच्या सांगण्यानुसार मुसेवालांच्या गाडीच्या मागील गाडीमध्ये दोन सुरक्षारक्षकांसहीत ते स्वत: प्रवास करत होते. मात्र अचानक सिद्धू मुसेवालांच्या गाडीला एका एसयूव्ही आणि सेडान गाडीने ओव्हरटेक केला. या प्रत्येक गाडीमध्ये चार शसस्त्र हल्लेखोर होते. या दोन्ही गाड्यांमधून हल्लेखोर खाली उतरले आणि त्यांनी सिद्धू मुसेवाला यांच्यावर गोळीबार करुन तिथून पळ काढला.
पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धू मुसेवाला यांच्यावर ३० गोळ्या झाडण्यात आले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी घटनास्थळावरुन एन-९४ रायफलच्या गोळ्या सापडल्याची माहितीही दिलीय.