घरावर पडणाऱ्या ‘शासकीय कुऱ्हाडी’विरोधात दंड ठोपटून रस्त्याच्या मधोमध असलेले घर राखणाऱ्या शिजियांग प्रांतातील बदकपालक शेतकरी दाम्पत्याची गाथा गेल्या पंधरा दिवसांपासून जगभरातील माध्यमांमधून वाखाणली जात होती . सरकार आणि जमीन मालक यांच्या संघर्षांत मालकाच्या हक्कांचे प्रतीक बनलेल्या या घरावर अखेर वरवंटा पडला . लुओ बाओजेन आणि त्याची पत्नी यांनी २,६०,००० येन( ३९, ५०० डॉलर) ही नुकसानभरपाई स्वीकारल्याचे वृत्त एपीने दिले आहे. तर गेल्या दोन आठवडय़ापासून जगभर या घराबाबतचे कुतूहल शमविण्याची स्पर्धा लागल्यामुळे दोन डझन प्रसार माध्यम प्रतिनिधींशी रोजच्या होणाऱ्या कंटाळवाण्या भडिमाराला वैतागून या दाम्पत्याने मिळेल ती नुकसान भरपाई स्वीकारण्याचे ठरविले अशी चर्चा आहे.
शिजियांग प्रांतातील वेनलिंग शहरानजीक वृद्ध शेतकऱ्यांच्या गावाला वळसा घालून नजीकच्या रेल्वेस्थानकाला जोडणारा हमरस्ता बांधण्यात आला. या रस्त्याच्या मधोमध या दाम्पत्याचे घर येत होते. सरकारी प्रतिनिधींनी हे घर पाडण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. मात्र, दाम्पत्याने त्यास दाद लागू दिली नव्हती. अखेरीस सरकारी यंत्रणेने नमते घेत हे घर तसेच ठेवून त्याच्या बाजूने ‘महामार्ग’ काढला होता.
वाद का?
लुओ यांच्या मते या घराची किंमत ६ लाख येन एवढी होती. सरकार नुकसान भरपाई म्हणून जी किंमत देऊ इच्छित होते, ती २, २० हजार येन इतकीच होती. त्यामुळे या सरकारी किमतीला झुगारून रस्त्याच्या मधोमध घर ठेवण्याचा विचित्र निर्णय या दाम्पत्याने घेतला होता. गेल्या आठवडय़ामध्ये प्रशासनाने नुकसान भरपाईमध्ये वाढ केली.
कसे झाले ‘पीपली लाईव्ह ’ ?
पीपली लाईव्ह चित्रपटामध्ये शेतकऱ्याची आत्महत्या वार्ताकनासाठी ज्या पद्धतीने प्रसार माध्यमांची चढाओढ झाली, तशाप्रकारचा ‘माध्यम ससेमीरा’ या वृद्ध दाम्पत्याला गेल्या दोन आठवडय़ांपासून सहन करावा लागत होता. माध्यमांना कंटाळून त्यांनी मिळेल ती रक्कम पदरात पाडून सरकारला शरण येण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा या भागात आहे.