गेल्या ३३ वर्षांत राष्ट्रीय राजकारणातील एक ध्रुव म्हणून भारतीय जनता पक्षाला नावारूपाला आणणारे लालकृष्ण अडवाणी यांनी नरेंद्र मोदींच्या निषेधार्थ दिलेल्या राजीनाम्यामुळे भाजपमधील वाजपेयी-अडवाणी युगाच्या समारोपाची सुरुवात झाली, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. अडवाणींच्या राजीनाम्यामुळे भाजपमध्ये नवी समीकरणे बघायला मिळण्याची शक्यता असून पक्षाचा तोंडवळा अधिक तरुण होण्याची चिन्हे आहेत.
सतत वाजपेयींच्या सावलीत वावरताना वाजपेयींच्या पश्चात पंतप्रधानपदाची जबाबदारी आपल्याला मिळेल, अशी आशा अडवाणींनी बाळगली होती. पण २००४ च्या लोकसभा निवडणुकीत बलाढय़ वाजपेयी सरकार पराभूत झाले आणि अडवाणींच्या मनसुब्यांना हादरा बसला. त्यानंतर अडवाणींच्या राजकारणाची गाडी घसरली ती नीट रुळावर आलीच नाही. कराचीत जाऊन त्यांनी भारत-पाक फाळणीचे शिल्पकार महमंद अली जिना धर्मनिरपेक्ष असल्याची प्रशस्ती दिली आणि संघाचा रोष ओढवून घेतला. तेव्हापासून अडवाणींची भाजपवरील वज्रपकड सैल झाली ती कायमची. गेल्या नऊ वर्षांत अडवाणींदेखत भाजपमध्ये सत्तेसाठी सुंदोपसुंदी वाढत गेली. २००९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर वयोवृद्ध अडवाणींना वानप्रस्थाश्रमात पाठवून भाजपची नव्याने बांधणी करण्याचा संकल्प सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोडला. पण त्यात यश आले नाही. मात्र, यंदा जानेवारीत भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजनाथ सिंह यांची निवड होताच पक्षांतर्गत समीकरणे बदलली आणि अडवाणींचे तेज कमी होऊ लागले. राजनाथ सिंह आणि नरेंद्र मोदी यांनी मिळून अडवाणी व त्यांच्या निष्ठावंत अनुयायांना एकाकी पाडले. अडवाणींच्या राजीनाम्यामुळे त्यांच्यासह पक्षातील अनेक वयोवृद्ध नेत्यांना निवृत्ती पत्करावी लागणार आहे. अडवाणींच्या राजीनाम्यामुळे भाजपच्या उभारणीत आपले जीवन वेचणारी पहिली पिढी पडद्याआड जायला सुरुवात होईल आणि त्यांची जागा दुसऱ्या-तिसऱ्या पिढीचे नेते घेतील अशी अपेक्षा आहे.

Story img Loader