कीव्ह (युक्रेन) : रशियाने वीज यंत्रणांवर क्षेपणास्त्र हल्ले चढवल्यामुळे युक्रेनमधील अनेक शहरे आणि गावांमध्ये मोठे वीज संकट उभे राहिले आहे. विशेष म्हणजे हिवाळय़ाच्या तोंडावर रशियाने खेळलेल्या या खेळीमुळे लाखो नागरिकांचे हाल होण्याची भीती आहे.

रशियाने गेल्या दोन आठवडय़ांपासून युक्रेनवर क्षेपणास्त्रे आणि आत्मघातकी ड्रोनद्वारे हल्ले सुरू ठेवले आहेत. राजधानी कीव्हसह युक्रेनच्या प्रमुख शहरांमधील वीज यंत्रणा आणि अन्य पायाभूत सुविधा हे रशियाचे मुख्य लक्ष्य आहे. वीज केंद्रांना लक्ष्य केल्यामुळे युक्रेनमध्ये पाण्याचीही तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. युक्रेनच्या नागरिकांचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी रशियाने ही खेळी खेळल्याचे मानले जाते.

मंगळवारी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी युक्रेनची एकतृतीयांश विद्युत केंद्रे नष्ट झाली असून त्यामुळे देशभरात मोठय़ा प्रमाणात वीजटंचाई निर्माण झाल्याचे जाहीर केले होते. तर रात्री चित्रफितीद्वारे केलेल्या संबोधनात त्यांनी नागरिकांना विजेचा अत्यंत जपून वापर करण्याचे आवाहन केले. जर्मनीने पुरवलेली हवाई सुरक्षा यंत्रणा सज्ज झाली असून आगामी काळात रशियाच्या हल्ल्यांचा मुकाबला केला जाईल, असा विश्वासही झेलेन्स्की यांनी बोलून दाखवला.

युद्धनीतीमध्ये बदल

युद्ध छेडल्यानंतर रशियाने सुरुवातीला युक्रेनमधील पायाभूत सुविधांना लक्ष्य केले नव्हते. कदाचित एखादा भाग ताब्यात घेतल्यानंतर या सुविधांची गरज भासू शकेल, असा विचार त्यामागे असावा. मात्र युक्रेन आघाडीवरील रशियाचे नवे प्रमुख जनरल सर्गेई सुरोविकिन यांनी या धोरणात बदल केला असून आता युक्रेनमधील पायाभूत सुविधांनाही लक्ष्य केले जाऊ लागले आहे.

खेरसनमधून निर्वासन सुरू

रशियाने एकतर्फी विलीकरण केलेल्या खेरसन प्रांतातील नागरिकांचे रशियामध्ये विस्थापन सुरू करण्यात आले आहे. युक्रेन सैन्याच्या हल्ल्याची भीती घालून रशियाव्याप्त खेरसनमधील नागरिकांना स्थलांतर करण्यास सांगितले जात आहे. हे स्थलांतर ऐच्छिक असल्याचे सांगितले जात असले, तरी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी नागरिकांना रशियात जाण्याचाच पर्याय शिल्लक असल्याचा आरोप पाश्चिमात्य देशांनी केला.

Story img Loader