नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आम आदमी पक्षाचे आमदार अमानुल्लाह खान यांना सोमवारी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक केली अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यांना संध्याकाळी विशेष न्यायाधीश राकेश स्याल यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. ईडीने त्यांची १० दिवसांची कोठडी मागितली असून, न्यायालयाने निकाल राखीव ठेवला आहे.

खान यांच्याविरोधात दोन प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) त्यांच्यावर वक्फ मंडळाशी संबंधित अनियमितता केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तर, लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने (एसीबी) त्यांच्याविरोधात बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याचा आरोप ठेवून गुन्हा दाखल केला आहे. ईडीने विशेष न्यायालयात खान यांच्या १० दिवसांच्या कोठडीची मागणी केली. तर खान यांच्या वकिलांनी त्यांच्या अटकेला आव्हान दिले. सूत्रांनी सांगितले की, ईडीने एप्रिलमध्ये खान यांची शेवटची चौकशी केल्यानंतर त्यांनी ईडीचे किमान १० समन्स टाळले. वेगवेगळ्या सबबींखाली ते ईडीसमोर उपस्थित राहणे टाळत राहिले. ईडीने सोमवारी पहाटे सहा वाजता ओखला भागातील खान यांच्या निवासस्थानी शोध कारवाई केली. त्यानंतर त्यांना आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदीखाली ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा >>>MeToo in Malyalam : “महिलांना पोलिसांत तक्रार करण्यास भाग पाडू नका”; कलाकार, पत्रकार, वकीलांसह ७० जणांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र!

कारवाईवर आपची टीका

ईडीने खान यांना केलेल्या अटकेबद्दल ईडीवर टीका केली आहे. भाजपविरोधातील प्रत्येक आवाज दाबणे हेच ईडीचे काम उरले आहे अशी टीका आपचे नेते मनिष सिसोदिया यांनी ‘एक्स’वरून केली. जे त्यांच्यासमोर झुकत नाहीत त्यांना अटक करून तुरुंगात टाकले जाते असा आरोप त्यांनी केला.