अंमलबजावणी संचलनालयाने मागील १५ महिन्यांमध्ये तब्बल १२ हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. केंद्र सरकारकडून याबद्दलची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या १० वर्षांमध्ये अंमलबजावणी संचलनालयाने जप्त केलेल्या संपत्तीच्या तुलनेत गेल्या १५ महिन्यांमधील कारवाईत जप्त करण्यात आलेली संपत्ती जास्त असल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे.
मागील वर्षभरात अंमलबजावणी संचलनालयाने ११ हजार ३२ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केल्याची माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री संतोष गंगवार यांनी दिली. एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही आकडेवारी सादर केली. ‘२००५ ते २०१५ या कालावधीत एकूण ९ हजार कोटी रुपयांची संपत्ती अंमलबजावणी संचलनालयाकडून ताब्यात घेण्यात आली,’ असेही त्यांनी सांगितले. याबद्दलचे आकडे अंमलबजावणी संचलनालयाच्या संकेतस्थळावर देण्यात आले आहेत. यंदाच्या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये ९५६.८४ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. २०१६-१७ मध्ये ब्रिटनमध्ये पळून गेलेला कर्जबुडवा उद्योगपती विजय माल्ल्याची संपत्ती जप्त करण्यात आली. या कालावधीत माल्ल्याची देशभरातील जवळपास १० हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
२०१६-१७ या कालावधीत तमिळनाडूमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. यामध्ये शेखर रेड्डी प्रकरण सर्वाधिक महत्त्वपूर्ण होते. या दरम्यान अंमलबजावणी संचलनालयाकडून अधिकाऱ्यांना कारवाई करण्याची पूर्ण सवलत देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळेच मागील १५ महिन्यांमध्ये गेल्या १० वर्षांच्या तुलनेत अधिक संपत्ती जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. आयकर विभाग आणि सीबीआयसारख्या संस्थांच्या समन्वयाने अंमलबजावणी संचलनालयाने धडाकेबाज कारवाई केली.
बोगस कंपन्यांविरोधातही अंमलबजावणी संचलनालयाने कारवाईचा धडका लावला आहे. परदेशांमध्ये कोट्यवधी रुपये पाठवलेल्या बोगस कंपन्यांविरोधात अंमलबजावणी संचलनालयाने वेगवान कारवाई सुरु केली. एप्रिल महिन्यात संचलनालयाकडून चेन्नईमध्ये एका ३६ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली. या व्यक्तीने ६ बोगस कंपन्यांच्या माध्यमातून ७८ कोटी रुपये परदेशात पाठवले होते.