पीटीआय, नवी दिल्ली
रेल्वेत नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळय़ाप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांविरोधात पहिले आरोपपत्र दाखल केले. त्यामध्ये त्यांची पत्नी व बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी व मुलगी खासदार मिसा भारती यांचा समावेश असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
लालूप्रसाद यादव यांची अन्य मुलगी हेमा यादव, यादव कुटुंबाचा निकटवर्तीय सहयोगी अमित कटय़ाल, रेल्वे कर्मचारी आणि संशयित लाभार्थी हृदयानंद चौधरी, ए के इन्फोसिस्टीम्स प्रा. लि. आणि ए बी एक्सपोर्ट्स प्रा. लि. या दोन फर्म यांचाही आरोपपत्रामध्ये समावेश करण्यात आला आहे.सात आरोपींचा समावेश असलेली तक्रार दिल्लीमधील विशेष आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंध कायदा (पीएमएलए) न्यायालयासमोर दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने या प्रकरणी १६ जानेवारीला सुनावणी निश्चित केली असल्याचे सांगण्यात आले.या प्रकरणी अमित कटय़ाल यांना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ईडीकडून अटक करण्यात आली. लालूप्रसाद यादव यांनाही चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, ते अद्याप हजर झालेले नाहीत.
हेही वाचा >>>गंभीर गुन्ह्यांमधील अल्पवयीन आरोपींच्या संख्येत वाढ
घोटाळा काय आहे?
यूपीए-१ सरकारदरम्यान लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना २००४ ते २००९ या कालावधीत रेल्वेच्या विविध क्षेत्रांमध्ये गट ड श्रेणीमध्ये अनेक लोकांना नोकऱ्या देण्यात आल्या होत्या. त्या बदल्यात त्यांनी यादव कुटुंबाचे सदस्य आणि त्यांच्याशी संबंधित ए के इन्फोसिस्टीम्स प्रा. लि. या कंपनीच्या नावावर आपापल्या जमिनी हस्तांतरित केल्या होत्या असा ईडीचा आरोप आहे.