जमीन घोटाळा प्रकरणात अडकलेले झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या विरोधात ईडीने मोठी कारवाई केली आहे. सोमवारी रात्री हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानावर ईडीने छापेमारी केली. त्यावेळी हेमंत सोरेन घरात नव्हते. मात्र हेमंत सोरेन यांची BMW कार आणि इतर कागदपत्रं ईडीने जप्त केली आहेत.
ईडीची आपल्या घरावर पडलेली धाड ही राजकीय अजेंड्याचा एक भाग आहे अशी टीका हेमंत सोरेन यांनी केली आहे. ३१ जानेवारी म्हणजेच आजच्या दिवसभरात माझा जबाब पुन्हा नोंद करवून घेण्याची दुर्भावना या कारवाई मागे दिसते आहे. २० जानेवारीच्या दिवशी जेव्हा हेमंत सोरेन यांची ईडी चौकशी झाली होती त्यावेळी मी ३१ जानेवारीला पुन्हा तुमच्यासमोर हजर होतो असं हेमंत सोरेन यांनी सांगितलं होतं. तर JMM चे अध्यक्ष सुप्रियो भट्टाचार्य यांनी ही सगळी कारवाई म्हणजे भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे असं म्हटलं आहे.
आमदारांची बैठक रद्द
हेमंत सोरेन यांना ईडीने चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं असतानच महाआघाडीच्या काही आमदारांना मुख्यमंत्र्यांच्या रांची येथील निवासस्थानी बोलवण्यात आलं होतं. मुख्यमंत्री निवासस्थानी त्यांची बैठक होणार होती. त्या बैठकीसाठी चंपई सोरेन, मिथिलेश ठाकूर आणि इतर काही आमदार पोहचलेही होते. मात्र काही वेळातच ही बैठक रद्द झाली. मात्र सगळ्या आमदारांना रांचीच्या आसपासच राहा असं सांगण्यात आलं आहे. तसंच अशीही चर्चा सुरु आहे की झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक होऊ शकते. त्यामुळे पोलिसांचा फौजफाटाही मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आला आहे. रांची येथील मुख्यमंत्री निवासस्थान आणि भाजपाचं कार्यालय तसंच इतर नेत्यांच्या घरांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
हे पण वाचा- झारखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ईडी; हेमंत सोरेन फरार झाल्याचा भाजपचा आरोप
२० जानेवारीला हेमंत सोरेन यांची चौकशी
२० जानेवारीच्या दिवशी हेमंत सोरेन यांची ईडीने सात तास चौकशी केली होती. ८.४६ एकर जमिनीशी संबंधित हे प्रकरण आहे. प्राप्तीकर आणि प्राप्तीकर विवरण यासंबंधीचे प्रश्न ईडीने हेमंत सोरेन यांना विचारले होते अशीही माहिती समोर आली होती. त्यानंतर आता दहाच दिवसात हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी छापेमारी झाली आहे. यामध्ये त्यांची बीएमडब्ल्यू कार जप्त करण्यात आली आहे तसंच काही कागदपत्रंही जप्त करण्यात आली आहेत.