गुजरात दंग्यानंतर मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर एक दशकापेक्षा अधिक काळ टाकलेला बहिष्कार मागे घेत त्यांच्याशी सहकार्याची भूमिका घेतली आहे. मात्र याचा अर्थ आम्ही मोदींचा उदोउदो करीत नसून गुजरातमधील दंगलीदरम्यान मानवी हक्कांचे झालेले उल्लंघन आजही चिंतेचा विषय असल्याचे गुरुवारी इंग्लंडने म्हटले आहे.
२००२ मध्ये झालेल्या गुजरात दंगलीत तीन इंग्लंडचे नागरिक मृत्युमुखी पडले होते. ही गोष्ट आमच्यासाठी अतिशय दु:खद असून त्यांच्यासाठी आम्हाला न्याय हवा, असे इंग्लंडचे उच्चायुक्त जेम्स बेवन यांनी म्हटले आहे. जामिया मिलिया इस्लामिया येथील कार्यक्रमानंतर ते बोलत होते. गुजरात दंगलीदरम्यान मानवी हक्कांचे झालेले उल्लंघन आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे. इंग्लंडच्या नागरिकांच्या हत्येप्रकरणात आम्हाला न्याय हवा आहे. त्यामुळे मोदींशी नव्याने घेतलेली सहकार्याची भूमिका त्या दृष्टीने अधिक लाभदायक ठरेल, असा विश्वास बेवन यांनी व्यक्त केला.
गेल्या ऑक्टोबरमध्ये मोदी यांच्यासोबत झालेली बैठक ही राजनैतिक स्वरूपाची होती. मोदींशी नव्याने सहकार्याची भू्मिका म्हणजे त्यांचा उदोउदो नाही, अशा शब्दांत बेवन यांनी मोदींबाबतची इंग्लंडची भूमिका मांडली.
इंग्लंडमधील विरोधी पक्षांनी नुकतेच मोदी यांना इंग्लंडभेटीचे निमंत्रण दिले होते. आधुनिक भारताचे भविष्य या विषयावरील भाषणासाठी मोदींना हे निमंत्रण दिले होते. मात्र हे निमंत्रण खासगी स्वरूपाचे आहे, तर मोदी यांनी व्हिसासाठी अर्ज केल्यास त्यांना देणार का, यावर थेट उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. हा थोडा वादाचा मुद्दा असून त्यावर आता भाष्य करणे योग्य नसल्याचे बेवन यांनी सांगितले.