इराकमध्ये दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याची शक्यता वर्तविण्यात आलेल्या कल्याणमधील ‘त्या’ चार तरुणांपैकी अरीफ मजीद(२२) याचा दहशतवादी युद्धात इराकमध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या अडीच महिन्यापासून कल्याणमधील बाजारपेठ विभागातील चार तरुण बेपत्ता असून, ते इराकमध्ये दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याची शक्यता असल्याचे ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने निदर्शनास आणले होते. आता यातील अरीफ मजीद या तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती बेपत्ता असलेल्यांपैकी एक शाहीन तन्की याने फोन करून दिली असल्याचे फहद शेखचे काका इफ्तिकार खान यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.
इफ्तिकार म्हणाले की, “अरीफचा इराकमध्ये शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मृत्यू झाल्याची माहिती शाहीनने दिली आहे. पण, त्याबद्दल चौकशी पथकाने अजूनतरी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही असेही शाहीनने सांगितले.”
गेल्या जवळपास अडीच महिन्यांपासून कल्याणमधील चार तरुण बेपत्ता आहेत. अरीफ मजीद (२२), शाहीन तन्की (२६), फहद मकबूल (२४), अमन तांडेल (२०) अशी त्यांची नावे आहेत. यातील अमनने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. उर्वरित तिघे अभियंत्याचे शिक्षण घेत आहेत. सिंगापूरमार्गे हे तरूण इरकामध्ये तेथील वंशवादी युद्धात सहभागी होण्यासाठी गेल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या कुटुंबियांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले होते व ज्यांनी आमच्या मुलांना फूस लावून पळून नेले आहे. त्याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे.

Story img Loader