लंडनमधील लीसेस्टरमध्ये हिंदू मंदिराच्या तोडफोडीसह हिंसाचाराच्या घटनेनंतर आता इंग्लंडमधील स्मेथविक शहरातील एका हिंदू मंदिरासमोर कथित मुस्लीम जमावाने आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मंदिराकडे जात असताना हा जमाव अल्लाहू अकबरचे नारे देतानाचा कथित व्हिडीओ समोर आला आहे. हे आंदोलक स्मेथविक परिसरातील दुर्गा भवन हिंदू मंदिराकडे जात होते. येथील सुरक्षा यंत्रणांनी जमावाला थांबवत कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याचा प्रयत्न केला असता, यातील काही आंदोलकांनी भिंतीवर चढण्याचाही प्रयत्न केला.
हेही वाचा>>> “पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदी योग्य बोलले”, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी जागतिक मंचावर जाहीरपणे मांडली भूमिका
‘बर्मिंगहॅम वर्ल्ड’ने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यानंतर इंग्लंडमधील लीसेस्टर शहरात हिंसक घटना घडल्या होत्या. येथे शहरातील एका हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आली होती, तसेच अज्ञात व्यक्तींनी मंदिराबाहेरिल भगवा ध्वज खाली खेचला होता. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरील ‘अपना मुस्लीम’ नावाच्या अकाऊंटवर मंगळवारी (२० सप्टेंबर) दुर्गा भवन मंदिराबाहेर ‘शांततापूर्ण निषेध’ आंदोलन करण्यासाठी जमा होण्याचे आवाहन करण्यात आले होते.
हेही वाचा>>> विश्लेषण: गांधी कुटुंबाबाहेर काँग्रेसचे अध्यक्षपद? थरूर विरुद्ध गेहलोत लढत होणार का?
त्यानंतर साधारण २०० कथित मुस्लीम जमावाने स्मेथविक शहरातील दुर्गा भवन हिंदू मंदिराकडे कूच केले. यावेळी आंदोलकांनी अल्लाहू अकबरचे नारे दिल्याचा दावा केला जातोय. दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून येतील सुरक्षा यंत्रणांनी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आंदोलकांनी मंदिर परिसरातील भिंतीवर चढण्याचा प्रयत्न केला.
लीसेस्टरमध्ये हिंदू आणि मुस्लीम गटांमध्ये वाद
२८ ऑगस्ट रोजी ‘आशिया चषक’ स्पर्धेत दुबईत खेळल्या गेलेल्या भारत-पाकिस्तान सामन्यानंतर लंडनमध्ये परिस्थिती बिघडण्यास सुरुवात झाली. लंडनमधील लीसेस्टरमध्येही हिंदू मंदिराच्या तोडफोडीसह हिंसाचाराची घटना समोर आली. या घटनेचा लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांनी निषेध नोंदवला आहे. या हल्ल्यामध्ये सहभागी असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उच्चायुक्तांनी केली.