बीजिंग आणि नजीकच्या परिसरात गेल्या महिन्यात हवेच्या प्रदूषणात लक्षणीय वाढ झाल्याचे चीनने बुधवारी मान्य केले. चीनमधील मोठय़ा शहरांमध्ये हवेत अत्यंत धोकादायक घटक असून नियमित स्तरापेक्षा त्याचे प्रमाण दुपटीने अधिक आहे.
बीजिंगमध्ये जून महिन्यात जवळपास सहा ते सात दिवस हवा अत्यंत खराब होती. शेजारच्या तिआनजीन आणि हेबेई प्रांतातही हवेत मोठय़ा प्रमाणावर प्रदूषण होते. तथापि, बीजिंग हे सर्वाधिक दूषित शहरांमधील एक शहर नसल्याचे संबंधित मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
सर्वाधिक प्रदूषित १० शहरांपैकी सात शहरे हेबेई प्रांतात आहेत. हॉँगकॉँगजवळच्या गुआंगडोंग येथे जून महिन्यात ९० टक्के हवा चांगली होती तर शांघायमध्ये हेच प्रमाण ६५.२ टक्के होते. प्रदूषण कमी करण्यासाठी  सरकारने २७७ अब्ज डॉलरची योजना मंजूर केली असून २०१७ पर्यंत सदर काम पूर्ण करण्यात येणार आहे.