अमृतसर : अमेरिकेतून १०४ बेकायदा भारतीय स्थलांतरितांना घेऊन आलेले अमेरिकेचे लष्करी विमान अमृतसरच्या श्री गुरू रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी दुपारी उतरले अशी माहिती सूत्रांनी दिली. यापैकी ३० स्थलांतरित पंजाबचे, हरियाणा व गुजरातचे प्रत्येकी ३३, तसेच महाराष्ट्र व उत्तर प्रदेशचे प्रत्येकी तीन आणि चंडीगडचे दोन आहेत आहेत असेही सूत्रांनी सांगितले. मात्र, आलेल्या स्थलांतरितांच्या संख्येबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यापूर्वीच्या वृत्तांमध्ये अमेरिकेचे सी-१७ हे लष्करी विमान २०५ बेकायदा स्थलांतरितांना घेऊन येत असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, सूत्रांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार बुधवारी आलेल्या विमानातून १०४ बेकायदा स्थलांतरित परत पाठवण्यात आले आहेत. स्थलांतरितांमध्ये १९ महिला आणि १३ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

बुधवारी दुपारी १.५५ वाजता अमेरिकेचे विमान अमृतसरला उतरले. विमानतळाबाहेर मोठ्या प्रमाणात बॅरिकेड उभारण्यात आले होते तसेच मोठ्या संख्येने पोलीस तैनात होते. अमेरिकी सरकारने भारतात परत पाठवलेला बेकायदा स्थलांतरितांचा हा पहिला गट आहे. त्यांची पडताळणी केल्यावर आणि पार्श्वभूमी तपासल्यानंतर त्यांना घरी जाऊ देण्याची अपेक्षा आहे असेही सूत्रांनी सांगितले. सर्व स्थलांतरितांची पंजाब पोलिसांसह निरनिराळ्या सरकारी संस्थांकडून चौकशी करण्यात येत आहे. कोणाच्या विरोधात गुन्हा दाखल आहे का हे तपासले जात आहे.

काही जणांच्या कुटुंबीयांनी सांगितले की त्यांनी जमिनी विकून आणि २०-२५ लाखांचे कर्ज घेऊन घरातील तरुण मुलांना उज्ज्वल भविष्यासाठी अमेरिकेत पाठवले होते. स्थलांतरितांना परत पाठवण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाबद्दल पंजाबचे अनिवासी भारतीय विषयक खात्याचे मंत्री कुलदीपसिंग धालिवाल यांनी मंगळवारी नाराजी व्यक्त केली.

काँग्रेसची टीका

नवी दिल्ली : अमेरिकेतून परत पाठवल्या जाणाऱ्या भारतीयांच्या हातात बेड्या घातल्याचे आणि त्यांना अवमानास्पद वागणूक दिल्याचे चित्र दु:खदायक आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसने बुधवारी व्यक्त केली. यूपीए सरकारच्या काळात भारतीय राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना देण्यात आलेल्या अपमानास्पद वागणुकीनंतर अमेरिकेला खेद व्यक्त करावा लागला होता याची आठवणही काँग्रेसच्या माध्यम व प्रसिद्धी विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी करून दिली. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनीही मंगळवारी स्थलांतरितांना नागरी विमानाने न पाठवता लष्करी विमानाने पाठवल्याबद्दल टीका केली होती.

डिसेंबर २०१३मध्ये भारतीय राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना अमेरिकेत बेड्या घातल्या होत्या आणि त्यांची शारीरिक झडती घेण्यात आली होती. त्यावेळी परराष्ट्र सचिल सुजाता सिंह यांनी अमेरिकेच्या राजदूत नॅन्सी पॉवेल यांच्याकडे कठोर शब्दांमध्ये निषेध केला होता. यूपीए सरकारनेही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. – पवन खेरा, काँग्रेस नेता