पीटीआय, वॉशिंग्टन/ह्यूस्टन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुधवारपासून सुरू होणाऱ्या अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. मोदींना स्वागतपर संदेश देण्यासाठी रविवारी २० प्रमुख शहरांमध्ये भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक एकत्र आले आणि त्यांनी मोदींच्या नावाचा जयघोष करीत मिरवणुकाही काढल्या.

वॉशिंग्टन डीसी आणि त्या परिसरातील भारतीय वंशाचे शेकडो नागरिक रविवारी राष्ट्रीय स्मारकाजवळ एकत्र आले होते. या नागरिकांनी एकतेचा संदेश देण्यासाठी पदयात्रा काढली आणि ‘आपण मोदींच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहोत’, असा संदेश दिला. ‘‘मोदी, मोदी’’ असा जयघोष करीत आणि भारत-अमेरिकेतील मैत्रीबाबत घोषणा देत, हे नागरिक मिरवणुकीने ऐतिहासिक ‘लिंकन मेमोरियल’कडे गेले आणि त्यांनी तेथे उत्स्फूर्त नृत्यही केले.

ह्यूस्टनमधील प्रतिष्ठित शुगरलँड मेमोरियल पार्क येथे एकत्र आलेल्या भारतीय वंशाच्या नागरिकांनी भारताचा राष्ट्रीय ध्वज आणि फलक हाती घेतले होते. तीच वेळ साधून बोस्टन, शिकागो, अटलांटा, मियामी, टँपा, डॅलस, लॉस एंजेलिस, सॅक्रॅमेंटो, सॅन फ्रान्सिस्को, कोलंबस आणि सेंट लुईस आदी शहरांमध्येही भारतीय वंशाच्या समुदायाने मोदींच्या स्वागताचा संदेश दिला. न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअर आणि सॅन फ्रान्सिस्कोमधील गोल्डन गेट ब्रिज यांसारख्या अनेक प्रसिद्ध ठिकाणी अशीच दृश्ये दिसत होती. ‘‘आम्हाला देशभरातील मान्यवर, प्रमुख उद्योजक आणि अन्य भारतीय-अमेरिकी संस्थांकडून पंतप्रधान मोदींचे स्वागत करणारे दररोज असंख्य संदेश येत आहेत. ते समाज माध्यमांवरही प्रसारित केले जात आहेत,’’ अशी माहिती ह्यूस्टनचे कॉन्सुल जनरल असीम महाजन यांनी सांगितले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फस्र्ट लेडी जिल बायडेन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी २१ ते २४जून दरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी २२ जूनला पंतप्रधान मोदींसाठी राजकीय मेजवानीचे आयोजन केले आहे. मोदी २२ जून रोजी अमेरिकी काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात भाषण करतील.पंतप्रधान मोदी २३ जून रोजी वॉशिंग्टनमधील रोनाल्ड रेगन बिल्डिंग आणि इंटरनॅशनल ट्रेड सेंटर येथे भारतीय वंशाच्या नागरिकांच्या नेत्यांच्या मेळाव्यात भाषण करतील.

मोदी शनिवारपासून इजिप्त दौऱ्यावर

पंतप्रधान २४ ते २५ जून दरम्यान इजिप्तच्या दौऱ्यावर जाणार असून तेथील ११व्या शतकातील अल्- हकीम मशिदीलाही भेट देणार आहेत. इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल्-सिसी यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी इजिप्तला जाणार आहेत. अल-हकीम मशिदीचे नूतनीकरण बोहरा समाजाने केले होते, अशी माहिती परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी पत्रकारांना दिली.

भारतीय अमेरिकी समुदाय आणि संपूर्ण अमेरिकेतील ऊर्जा, अंतराळ, आरोग्य, शिक्षण आणि माहिती तंत्रज्ञान यांसारख्या विविध उद्योगांमधील प्रमुख व्यावसायिक पंतप्रधान मोदींच्या ऐतिहासिक अमेरिका भेटीबद्दल आशावादी आहेत. संपूर्ण अमेरिकेत उत्साहाचे वातावरण आहे. -असीम महाजन, कॉन्सुल जनरल, ह्यूस्टन

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Enthusiasm to welcome prime minister narendra modi in america amy
Show comments