सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हायर्नमेंटच्या संचालक सुनिता नारायण (५२ वर्षे) या नवी दिल्ली येथे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत.
रविवारी सकाळी दक्षिण दिल्लीमधील ग्रीन पार्क परिसरातील लोधी गार्डनच्या दिशेने सायकलींग करत असताना त्यांना कारने धडक दिली, त्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सुनिता नारायण यांना एम्सच्या ट्रामा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल आलं असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. सुनिता नारायण यांच्या हाताला आणि नाकाला या अपघातात गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर त्यांच्यावर एक शस्त्रक्रियाही करण्यात आली. तब्बल साठेआठ तास चाललेल्या या शस्त्रक्रियेत त्यांच्या हातात दोन रॉड टाकण्यात आले. एम्सचे डायरेक्टर डॉ. एम.सी मिस्रा यांनी सुनिता नारायण यांची प्रकृती स्थिर असून त्या उपचारांना प्रतिसाद देत असल्याते सांगितले. मात्र, सध्या त्या जबाब देण्याच्या स्थितीत नाहीत, अशीही माहिती पोलिसांतर्फे देण्यात आली आहे.
ग्रीन पार्क परिसरात एक वाहन मागे येण्याचा प्रयत्न करत असताना त्यांने सुनिता नारायण यांना धडक दिली. पोलिसांतर्फे हौस खास पोलीस स्टेशनमध्ये अपघाताप्रकरणी अज्ञात कारचालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.