पीएफ हा खरंतर देशभरातील कोट्यवधी नोकरदार वर्गासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. दर महिन्याला पगारातून वजा होणारी रक्कम आपल्या पीएफ खात्यामध्ये जमा होतेय, याचं समाधान नोकरदार वर्गाला असतं. त्याच भरवशांवर निवृत्तीकाळाची बेगमी या वर्गाकडून केली जात असते. अडी-अडचणीला ही रक्कम हाच या नोकरदार वर्गासाठी मोठा आधार असतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून काही पीएफ खातेधारकांमध्ये त्यांच्या खात्यातील रकमेसंदर्भात मोठा संभ्रम निर्माण झाला होता. यासंदर्भात ईपीएफओनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून स्पष्टीकरण दिलं असून त्यामुळे देशभरातील कोट्यवधी पीएफ खातेथारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नेमकं काय घडलं?
गेल्या काही दिवसांपासून ईपीएफओच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पीएफ खातेधारकांकडून व्याजदरासंदर्भात विचारणा केली जात आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीचं व्याज अद्याप पीएफ खात्यांमध्ये जमा करण्यात आलेलं नसल्याची तक्रार खातेधारकांकडून केली जात आहे. केंद्र सरकारने या आर्थिक वर्षासाठी ८.१ टक्के इतका व्याजदर पीएफच्या रकमेवर निश्चित केला आहे. सामान्यपणे केंद्र सरकारकडून व्याजदर निश्चित झाल्यानंतर तो पीएफ खातेधारकांच्या खात्यात जमा करायला सुरुवात केली जाते. यंदा मात्र या आर्थिक वर्षाच्या व्याजाची रक्कम अद्याप अनेक खात्यांमध्ये जमाच केलेली नसल्यामुळे खातेधारकांमध्ये घबराट पसरली होती.
यासंदर्भात ईपीएफओच्या ट्विटर हँडलवर काही खातेधारकांनी विचारणा केली असता त्यावर ईपीएफओकडून खुलासेवजा स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. “प्रिय ईपीएफओ, माझं व्याज कुठे आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुधारणा हव्या आहेत. मग नोकरशाहीच्या अकार्यक्षमतेचा भुर्दंड सामान्य नागरिकांनी का म्हणून भोगावा?” असा सवाल एका ट्विटर युजरनं विचारला होता. त्यावर ईपीएफओकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
“कोणत्याही खातेधारकाचं व्याज व्यपगत झालेलं नाही. सर्व खातेधारकांच्या खात्यांमध्ये व्याजाची रक्कम जमा केली जात आहे. ईपीएफओच्या सॉफ्टवेअरमध्ये काही तांत्रिक बदल केले जात असल्यामुळे खातेदारांच्या अकाऊंट स्टेटमेंटमध्ये ही रक्कम जमा झाल्याचं दिसत नाही”, असं ईपीएफओकडून सांगण्यात आलं आहे.
सेटलमेंट करणाऱ्या खातेधारकांनाही मिळणार व्याज
दरम्यान, जे खातेदार या काळात सेटलमेंटसाठी अर्ज करत आहेत त्यांनाही स्टेटमेंटमध्ये न दिसणारी ही व्याजाची रक्कम मिळूनच एकूण रक्कम दिली जात आहे,असंही ईपीएफओकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
लवकरच खात्यामध्ये रक्कम दिसणार
“ईपीएफओकडून व्याजाची रक्कम खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच ही रक्कम तुमच्या खात्यांमध्ये दिसू लागेल. जेव्हा केव्हा ही रक्कम जमा केली जाईल, तेव्हा ती पूर्ण रक्कम जमा होईल. कोणत्याही स्वरूपात या रकमेत कपात केली जाणार नाही”, असंही ईपीएफओकडून एका ट्विटर युजरला उत्तरादाखल सांगण्यात आलं आहे.
ईपीएफओकडून देण्यात आलेल्या या स्पष्टीकरणामुळे कोट्यवधी पीएफ खातेधारकांचा जीव भांड्यात पडला आहे.