निवृत्तीनंतर अथवा नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर भविष्य निर्वाह निधी (पीएफ) मिळवण्यासाठी पीएफ कार्यालयात खेटा माराव्या लागतात. पीएफ मिळण्यासाठी किमान दोन महिने तरी वाट पहावी लागते. मात्र, आता ही प्रतीक्षा संपण्याची शक्यताोहे. अवघ्या तीन दिवसांत पीएफ मिळू शकणार आहे. भविष्य निर्वाह निधी संस्था या दृष्टीने गांभीर्याने विचार करत असून ५ जुलै रोजी यासंदर्भात तपशीलवार योजना तयार करण्यासाठी पीएफच्या सर्व विभागीय अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यानंतरच ही योजना अंमलात येण्याची शक्यता आहे. अवघ्या तीन दिवसांत पीएफ मिळाल्यास त्याचा देशभरातील एक कोटी कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. यंदाच्या आर्थिक वर्षांत भविष्य निर्वाह निधी संस्थेकडे पीएफ काढण्यासाठी एक कोटी २० लाख अर्ज येणार असून त्यातील ७० टक्के कर्मचाऱ्यांना तीन दिवसांत पीएफ देण्याचा संस्थेचा विचार आहे. गेल्या आर्थिक वर्षांत पीएफचे एक कोटी ८ लाख दावे निकाली काढण्यात आले होते.

Story img Loader