संरक्षण विभागात हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयने मंगळवारी कॅनेडियन नागरिक राहुल गांगल याला अटक केली आहे. सीबीआयने याआधी पत्रकार विवेक रघुवंशी यांना अटक केली होती. पत्रकार विवेक रघुवंशी यांच्याकडून आरोपी राहुल गांगल याला संरक्षण आणि सशस्त्र दलांशी संबंधित संवेदनशील कागदपत्रे पुरवली जात होती.
आरोपी राहुल गांगल याने ‘डिफेन्स डीलर’ म्हणून काम केलं असून तो जर्मनीस्थित कन्सल्टन्सी फर्म ‘रोलँड बर्जर’संस्थेशी संबंधित आहे. आरोपी गांगल हा मुळचा भारतीय नागरिक असून त्याने २०१९ मध्ये कॅनडियन नागरिकत्व स्वीकारलं आहे. सोमवारी तो भारतात येताच सीबीआयने त्याला अटक केली, अशी माहिती सीबीआयच्या एका अधिकाऱ्यांनी दिली. आरोपी गांगल याला विशेष न्यायालयाने चार दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.
सीबीआयने मे महिन्यात माजी नेव्ही कमांडर आशिष पाठक आणि फ्रीलान्स पत्रकार विवेक रघुवंशी यांना हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली होती. यानंतर आता राहुल गांगल यालाही अटक केली आहे.
‘पीटीआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, माजी नौदल कमांडर आशिष पाठक आणि फ्रीलान्स पत्रकार विवेक रघुवंशी यांच्यावर संरक्षण विभागाशी संबंधित संवेदनशील माहिती बेकायदेशीरपणे गोळा केल्याचा आणि ती परदेशी गुप्तचर संस्थांना दिल्याचा आरोप आहे.
पत्रकार रघुवंशी हे संरक्षण आणि सामरिक घडामोडींवर बातम्या देणाऱ्या अमेरिकेतील वेबपोर्टलचे भारतीय पत्रकार आहेत. रघुवंशी यांना अटक करण्यापूर्वी केलेल्या छापेमारीत सीबीआयने अनेक संवेदनशील कागदपत्रे जप्त केली आहेत. रघुवंशी आणि पाठक यांच्यावर ऑफिशिअल सिक्रेट अॅक्टसह हेरगिरीच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.