पीटीआय, नवी दिल्ली : मणिपूरमधील विविध वांशिक गटांमध्ये शांतता प्रक्रियेचे सुलभीकरण करणे आणि परस्परविरोधी पक्षांमध्ये संवादाची सुरुवात करणे, यासाठी केंद्र सरकारने राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने शनिवारी सांगितले. या शांतता समितीत मुख्यमंत्री, काही मंत्री, खासदार, निरनिराळय़ा राजकीय पक्षांचे नेते आणि नागरी समाज गट यांचा समावेश असल्याचे मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.
राज्यातील विविध वांशिक गटांमध्ये शांतता निर्मितीची प्रक्रिया सुलभ करणे, तसेच संघर्ष करत असलेले पक्ष आणि गट यांच्यात शांततापूर्ण संवाद आणि वाटाघाटी सुरू करणे हे या समितीचे काम असेल. ही समिती सामाजिक सुसंगतता व परस्परांबाबतची समजूत बळकट करेल आणि विविध वांशिक गटांमध्ये सौहार्दपूर्ण संवाद सुलभ करेल, असेही निवेदनात नमूद केले आहे.
या समितीत माजी सनदी अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ, साहित्यिक, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध वांशिक गटांचे प्रतिनिधी यांचाही समावेश राहील, असे मंत्रालयाने सांगितले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी २९ मे ते १ जून या काळात मणिपूरला भेट दिली होती आणि तेथील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर शांतता समिती गठीत करण्याची घोषणा केली होती. अनुसूचित जमातीचा दर्जा मिळण्याबाबत मैतेई समुदायाच्या मागणीच्या विरोधात ३ मे रोजी पर्वतीय जिल्ह्यांमध्ये ‘आदिवासी एकता मोर्चा’ आयोजित करण्यात आल्यानंतर मणिपूरमध्ये हिंसक चकमकी उसळल्या होत्या.
सरमा- एन. बिरेन सिंह चर्चा
इम्फाळ : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शनिवारी मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांची भेट घेतली. पहाटेच गुवाहाटीवरून सरमा इम्फाळला रवाना झाले होते. मणिपूरमधील ताज्या स्थितीवर दोघांनी चर्चा केल्याचे समजते. मणिपूरमध्ये अद्याप तुरळक हिंसाचार सुरूच आहे. महिन्याभरापूर्वी या राज्यात जातीय हिंसाचार भडकला होता, ज्यात सुमारे शंभरावर नागरिक मृत्युमुखी पडले सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हिमंता बिस्वा सरमा यांनी दिल्लीचा निरोप मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना कळवल्याचे समजते. हा हिंसाचार थांबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा केंद्राचा संदेश असल्याचे समजते.
शस्त्रे जमा करण्याचे आवाहन
इम्फाळ : सुरक्षा दलांची लुटलेली शस्त्रास्त्रे परत करण्यासाठी भाजपचे आमदार सुसिंद्रो मैतेई यांनी आपल्या निवासस्थानी एक पेटी (‘ड्रॉप बॉक्स’) ठेवण्यात आला आहे. येथे शस्त्रे परत करणाऱ्या व्यक्तीची ओळख उघड होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. पूर्व इंफाळचे आमदार सुसिंद्रो यांनी घराबाहेर लावलेल्या फलकावर इंग्रजी व मैतेई भाषेत ‘कृपया येथे आपली शस्त्रे ठेवावीत’ असे आवाहन केले आहे.