समाजवादी पक्षाचे खासदार विश्वंभर चौधरी यांनी शुक्रवारी राज्यसभेत तुम्हाला रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर फक्त टाळ्या वाजवा, अशी मुक्ताफळे उधळली. तृतीयपंथी व्यक्तींना समान अधिकार मिळावेत यासाठीच्या खासगी सदस्य विधेयकावरील चर्चेत सहभाग घेतला असताना त्यांनी हे वक्तव्य केले. आपल्याकडे लग्नात किंवा मुले झाल्यानंतर आशीवार्द देण्यासाठी येणारे तृतीयपंथी तुम्ही पाहिले असतील. ते सतत टाळ्या वाजवत असल्याचे आपण बघितले किंवा ऐकले असेल. टाळ्या वाजवणे ही अॅक्युप्रेशरसारखी उपचारपद्धती आहे. तृतीयपंथी व्यक्तीला मी कधीही रुग्णालयात दाखल झालेले पाहिलेले नाही. कारण ते सतत टाळ्या वाजवतात, त्यामुळेच तृतीयपंथी कधीही आजारी पडत नाहीत. समाजाला ही गोष्ट त्यांच्याकडून घेण्यासारखी आहे. याशिवाय, भजन-कीर्तन करतानाही जे लोक टाळ्या वाजवतात, त्याने आरोग्य चांगले राहण्यासाठी मदत होत असल्याचे, चौधरी यांनी चर्चेदरम्यान म्हटले. चौधरी यांनी तृतीयपंथी लोकांविषयीच्या विषमतेचा मुद्दा उपस्थित करत त्यांना समान हक्क देण्याची मागणीही यावेळी केली.
द्रमुक पक्षाच्या तिरूची सिवा यांनी राज्यसभेत मांडलेल्या या विधेयकाला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला. येथून पुढे कोणत्याही अर्जात खासगी माहिती भरतेवेळी लिंग नमूद करताना तृतीयपंथी व्यक्तींसाठी स्वतंत्र रकाना असला पाहिजे. तसेच रूग्णालयात त्यांच्यासाठी स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात यावा, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार पी. राजीव यांनी केली. या चर्चेला उत्तर देताना सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांनी सरकार तृतीयपंथी समाजाच्या विकासासाठी विशेष धोरण आणणार असल्याचे सांगितले. यामुळे त्यांना मागासवर्गीय जातींप्रमाणे विशेष सुविधा प्राप्त होऊ शकतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा