रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला आता दोन वर्षांहून अधिकचा काळ लोटला आहे. अद्याप या युद्धातून कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. त्यातच आता युद्धाची व्याप्ती वाढण्याची चिंता निर्माण झाली आहे. “रशियाने कीव्हचा पाडाव केल्यास रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन थांबणार नाहीत. ते युरोपचे शत्रू आहेत. त्यामुळे युरोपियन लोकांनी कच न खाता रशियाला खंबीरपणे उत्तर देण्यासाठी तयार राहावे”, असे आवाहन फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी केलं आहे. मॅक्रॉन यांनी मागच्या महिन्यात केलेल्या एका विधानामुळं वाद निर्माण झाला होता. भविष्यात युक्रेनमध्ये फ्रेंच सैन्य तैनात करण्यास आम्ही कसूर करणार नाही, असे विधान त्यांनी केलं होतं. या विधानानंतर इतर फ्रान्समधील इतर नेत्यांनी अंतर राखलं होतं. मात्र पूर्व युरोपमधील काही देशांनी या विधानाला पाठिंबा दिला.
एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मॅक्रॉन म्हणाले, “रशियाने जर हे युद्ध जिकलं तर युरोपची विश्वासाहर्ता शून्यावर येईल.” त्यांच्या या विधानानंतर फ्रान्समधील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी टीका केली असून मॅक्रॉन युद्धखोरीची भाषा बोलत असल्याचे म्हटले.
विरोधकांच्या टीकेलाही मॅक्रॉन यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, मी विरोधकांच्या मताशी असहमत आहे. आज युक्रेनला पाठिंबा देण्यापासून दूर राहणे किंवा युक्रेनच्या मदतीच्या विरोधात मतदान करण्यासारखा निर्णय घेऊन आपण शांतता निवडत नसून पराभव निवडत आहोत. जर युरोपमध्ये युद्ध ठिणगी पडली तर त्यासाठी रशिया जबाबदार असेल. जर आपण आज मागे राहण्याचा किंवा घाबरून बसण्याचा निर्णय घेतला, तर आपण आजच पराभव स्वीकारत आहोत, असे मी मानतो आणि मला हे मान्य नाही.
मॅक्रॉन यांचा प्रमुख विरोधी आणि अतिउजव्या नॅशनल रॅली पक्षाच्या नेत्या मरीन ले पेनने यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला फ्रान्सने युक्रेनशी केलेल्या सुरक्षा कराराच्या मतदानापासून स्वतःला दूर ठेवले. तर कट्टर डावा पक्ष असलेल्या ला फ्रान्स इन्सोमिस (La France Insoumise) या पक्षाने विरोधात मतदान केले.
इमॅन्युएल मॅक्रॉन पुढे म्हणाले, युरोपने लाल रेषा आखून क्रेमलिनला कमकुवत करू नये, यामुळे रशियाला युक्रेनमध्ये आणखी ताकदीनं पुढे जाण्यास बळ मिळेल. मला वाटतं रशियानं हे युद्ध तात्काळ थांबवावं आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी सहकार्य करावं. फ्रान्स रशियाविरुद्ध कधीही युद्ध छेडणार नाही. उलट रशियाने फ्रान्सचे हितसंबंध असलेल्यांवर आक्रमन केल्यानंतरही पॅरिसने मॉस्कोविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली नाही.
युक्रेन आज कठीण परिस्थितीला तोंड देत आहे आणि त्यांना मित्र राष्ट्रांकडून मदतीची आवश्यकता आहे. शांततेचा अर्थ असा नाही की, युक्रेनने आत्मसमर्पण करावे. शांतता हवी आहे म्हणून पराभव स्वीकारणे योग्य नाही. जर शांतता हवी आहे, तर युक्रेनला वाऱ्यावर सोडून चालणार नाही, असेही मॅक्रॉन पुढे म्हणाले.