लंडन : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शस्त्रसंधी करारासाठी योजना आखण्यावर काम करण्यावर ब्रिटन, फ्रान्स आणि युक्रेनमध्ये सहमती झाली आहे. युक्रेन समस्येवर ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी रविवारी लंडनमध्ये आयोजित केलेल्या युरोपीय देशांच्या नेत्यांच्या शिखर परिषदेत याविषयी माहिती दिली. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की हेही परिषदेला उपस्थित राहिले. युद्धविरामाची ही योजना अमेरिकेसमोर सादर केली जाईल असे स्टार्मर यांनी सांगितले.
व्हाइट हाऊसमध्ये शुक्रवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर जाहीर खडाजंगी झाल्यानंतर झेलेन्स्की तिथून निघून गेले आणि लंडनला रवाना झाले. ते शनिवारी लंडनमध्ये पोहोचले त्यावेळी त्यांचे शाही स्वागत करण्यात आले. रविवारच्या बैठकीवर त्या अभूतपूर्व खडाजंगीचे सावट होते. शुक्रवारच्या घटनेनंतर स्टार्मर आणि माक्राँ या दोघांनीही ट्रम्प यांच्याशी संभाषण केले आहे. आपण केवळ घडलेल्या घटना उगाळत बसण्यापेक्षा शांतता चर्चा पुन्हा प्रस्थापित करण्यावर लक्ष केंद्रित केले असल्याचे स्टार्मर यांनी स्पष्ट केले. तसेच, आपला रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यावर विश्वास नाही. पण, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आहे असे त्यांनी सांगितले. युद्ध थांबवण्याची इच्छा असलेल्या सर्व देशांना बरोबर घेण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली. युद्धविरामाचा करार हा कायमस्वरूपी असावा, तात्पुरता नको असे स्टार्मर यांनी स्पष्ट केले.
परिषदेच्या पार्श्वभूमीवर ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत स्टार्मर म्हणाले, ‘‘अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना युक्रेनमध्ये दीर्घकालीन टिकणारी शांतता हवी आहे, याची मला खात्री आहे. या मुद्द्यावर मी त्यांच्या मताशी सहमत आहे. रशियाने सुरू केलेले बेकायदा युद्ध संपावे आणि युक्रेनचेही भवितव्य सुरक्षित राहावे, यासाठी मार्ग काढण्यासाठी मी कटिबद्ध आहे. आम्ही युक्रेनला युरोपीय देशांकडून मिळू शकणाऱ्या सुरक्षेच्या हमीवर अधिक तयारी करणे आवश्यक आहे. तसेच, अमेरिकेबरोबरही चर्चा सुरू ठेवायला हवी.’’
‘युरोपसमोर दुर्मीळ पेच’
गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध हा युरोपसमोरील दुर्मीळ पेच असल्याचे मत स्टार्मर यांनी व्यक्त केले. एखाद्या पिढीला क्वचितच अनुभवायला येणारा हा प्रसंग असल्याचे ते म्हणाले. युक्रेनच्या संरक्षणासाठी व युद्धसमाप्तीसाठी आपले प्रयत्न वाढवण्याची गरज आहे असे त्यांनी या परिषदेत सहभागी झालेल्या नेत्यांना सांगितले. रशिया एकीकडे शांततेविषयी बोलत असताना दुसरीकडे सातत्याने हल्ले सुरू ठेवले आहेत अशी टीका त्यांनी केली. सर्वांना फायदा होईल अशा पद्धतीने शांततेसाठी कोणती पावले उचलावीत यावर आपण सहमत होणे आवश्यक आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
झेलेन्स्की यांनी या वेळी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा केली. इटलीसह फ्रान्स, जर्मनी, डेन्मार्क, नेदरलँड, नॉर्वे, पोलंड, स्पेन, कॅनडा, फिनलंड, स्वीडन, रोमानिया, झेक रिपब्लिक या देशांचे प्रतिनिधी युक्रेनवरील शिखर परिषदेला उपस्थित होते. तुर्कीचे परराष्ट्रमंत्री, नाटोचे सरचिटणीस आणि युरोपीय आयोगाचे आणि युरोपीय काउन्सिलच्या अध्यक्षांचीही उपस्थिती होती. युक्रेनचे लष्करी सहाय्य, रशियावरील आर्थिक दबाव, अधिक मजबूत आणि दीर्घकालीन टिकेल असा शांतता करार आणि युक्रेनच्या सुरक्षेची हमी आदी मुद्द्यांवर चर्चा झाली.
जर युद्धविरामाचा करार करायचा असेल तर, त्या कराराचेही संरक्षण करावे लागेल. कारण सर्वात वाईट शक्यता ही आहे की युद्ध तात्पुरते थांबवले जाईल आणि पुतिन पुन्हा आक्रमण करतील. हे पूर्वीही घडले आहे. – कीथ स्टार्मर, पंतप्रधान, ब्रिटन